लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्ग घटत नसून, दररोज रुग्णांची उच्चांकी नोंद होत आहे. शनिवारी सलग चौथ्या दिवशी ९८६ रुग्ण आढळून आले असून, गेल्या चार दिवसांत तब्बल ३९०५ रुग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहर, चोपडा, भुसावळसह आता एरंडोलही हॉटस्पॉट ठरले आहे. शहरात तर कोरोना थांबतच नसून, बाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
जळगाव शहरात शुक्रवारी ३६३ बाधितांची नोंद करण्यात आली होती. शनिवारी पुन्हा ३५० रुग्ण आढळून आले आहेत, तर १६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ही २८८५ वर पोहोचली आहे. चोपड्याची वाटचाल एक हजारांच्या दिशेने सुरू असल्याचे गंभीर चित्र आहे. शनिवारी जिल्ह्यात ६४३ आरटीपीसीआर अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी १६७ जण बाधित आढळून आले आहेत. यासह ॲन्टिजेनच्या ४११४ चाचण्या करण्यात आल्या असून, यात ८१९ बाधित आढळून आले आहेत. यासह १०१२ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. ६४८ अहवाल प्रलंबित आहेत.
पाच हॉटस्पॉट
जळगाव : ३५०
चोपडा : १४१
भुसावळ : ८९
एरंडोल : ७९
जामनेर : ६७
पॉझिटिव्हिटी
आरटीपीसीआर : २५.९७ टक्के
ॲन्टिजेन : १९ टक्के
शहरात चार दिवसांत १२००
शहरात गेल्या चार दिवसांत १२४५ नवे रुग्ण समोर आले आहेत. सरासरी तीनशे रुग्ण रोज शहरात समोर येत आहेत. शहरातील बाधितांची संख्या १८,५८४ वर पोहोचली आहे. ग्रामीण भागातही सातत्याने रुग्ण समोर येत आहेत. शनिवारी जळगाव ग्रामीणमध्ये २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
मृत्यू वाढले
गेल्या पाच दिवसांपासून मृतांची संख्या वाढली आहे. शनिवारी जळगाव शहरातील ६५ वर्षीय पुरुष, चोपडा तालुक्यातील ८२ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, रावेर तालुक्यातील ७८ वर्षीय पुरुष, भुसावळ तालुक्यातील ६३ वर्षीय पुरुष, धरणगाव तालुक्यातील ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या १४३८ वर पोहोचली आहे.
लसीकरण कुठे सुरू, कुठे बंद
कोरोना प्रतिबंधक लसीकरण शनिवारी कुठे सुरू, तर कुठे बंद अशी स्थिती होती. यात आरोग्य केंद्रांमध्ये हे शनिवारी बंद ठेवण्यात आले होते. शनिवारी १६४६ लोकांना पहिला, तर ५२४ लोकांना दुसरा डोस देण्यात आला. पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ५१,०७४ वर पोहोचली आहे.
जीएमसीतील एक रस्ता बंद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कक्ष ७ व ८ मध्ये कोरोना रुग्णांना दाखल करण्याचे नियोजन सुरू करण्यात येत आहे. यासाठी एक रस्ता बंद करण्यात आला आहे. मात्र, जोपर्यंत मनुष्यबळाचा मुद्दा सुटणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी रुग्ण कसे दाखल करावे, हा पेच आता प्रशासनासमोर आहे. अनेक डॉक्टर बाधित आढळून आल्याने हा पेच निर्माण झाला आहे.
पुन्हा दोन डॉक्टर बाधित
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पुन्हा दोन डॉक्टर बाधित आढळून आले असून, बाधित डॉक्टरांची संख्या २७ वर पोहोचली आहे. अन्य कर्मचारी असे एकूण ४८ जण जीएमसीत बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मनुष्यबळाचा मुद्दा गंभीर झाला आहे.