जळगाव जिल्ह्यातील क्रीडा पुरस्कार हे नेहमीच वादात अडकतात किंवा प्रलंबित तरी राहतात. हीच परंपरा यंदाही कायम राहिली. २६ जानेवारीला हे पुरस्कार मिळणे अपेक्षित होते. तरी अद्यापही हे पुरस्कार जिल्ह्यातील खेळाडूंना मिळालेले नाहीत. त्यामुळे खेळाडू आणि क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत.
शेजारच्या धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये क्रीडा पुरस्कार देण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात त्यांचा गौरवदेखील करण्यात आला आहे. मात्र, जळगावला क्रीडा कार्यालयाने हे पुरस्कार जाहीर केलेच नाहीत. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात हजर राहून सत्कार स्वीकारण्याचे भाग्य या खेळाडूंंना मिळाले नाही. जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे गुणवंत खेळाडू, गुणवंत प्रशिक्षक आणि संघटक यांना पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचा सन्मान केला जातो. हा सन्मान मिळावा, यासाठी बहुतेक खेळाडू वर्षभर तयारी करतात. मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सातत्याने जळगावातील खेळाडूंची याबाबतीत उपेक्षाच होत आहे. त्यांना सन्मान प्रलंबित तरी राहतात किंवा त्यावरून वाद उपस्थित होतात. यंदा हे पुरस्कार प्रलंबित राहत आहेत. जिल्हा क्रीडा कार्यालयाने यंदा कोरोनाचे कारण सांगत हा पुरस्कार जाहीर करण्याचे टाळले. त्याऐवजी आता १ मे रोजी हे पुरस्कार दिले जाणार आहेत. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात हे पुरस्कार दिले जातील. कोरोनामुळे यंदा प्रजासत्ताक दिवसदेखील साजरा होणार की नाही, याबाबत शंका होती. मात्र, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर हा कार्यक्रम साजरा दरवर्षीप्रमाणेच थाटात साजरा करण्यात आला. मात्र, फक्त जिल्हा क्रीडा कार्यालयानेच कोरोनाचे कारण पुढे केले आहे. कोरोनाच्या काळात सर्व शासकीय कार्यालयांनी आपल्या कार्यालयातील प्रवेश मर्यादित केले होते. तसेच प्रवेशद्वारात देखील बदल केले होते. मात्र, हे बदल नंतरच्या काळात रद्द करून प्रवेश पूर्ववत करण्यात आले आहेत. फक्त क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात केलेले बदल अजूनही कायम आहेत. कार्यालयात पूर्वी मुख्य रस्त्यासमोरूनच प्रवेश होता. मात्र, नंतर तो मैदानातून फिरून मागच्या बाजूने करण्यात आला होता. अजूनही हा बदल कायम आहे. त्यामुळे या कार्यालयावरील कोरोनाची अवकृपा कधी संपणार, या प्रतीक्षेत खेळाडू आणि क्रीडा रसिक आहेत.