जळगाव : गांजाची केस दाखल न करण्यासाठी ८ हजाराची लाच स्वीकारणारे सहायक फौजदार बापुराव फकिरा भोसले (५२,रा.चाळीसगाव, मूळ रा.आमडदे, ता.भडगाव) व कॉन्स्टेबल गोपाल गोरख बेलदार (३१, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर ह.मु.चाळीसगाव) या दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या दोघांना साक्षीदार विक्की चौधरी याच्याकडूनही १२ हजार रुपये लाच घेतल्याचे उघड झाले असून चौधरी याने तसा जबाबही पोलिसांना दिला आहे.भोसले व बेलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री चाळीसगाव येथे ८ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. उपअधीक्षक गोपाल ठाकूर यांच्या पथकातील तपासाधिकारी एस.के.बच्छाव यांनी रविवारी दोनही पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ मे पर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.दरम्यान, भोसले व बेलदार यांनी शहरातील दाखल प्रकरणात अशाच प्रकारे लाचेची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे, त्याशिवाय भोसले यांच्या मालमत्तेची यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी झालेली आहे. दोघांची मालमत्ता, बॅँक खाते, म्युचल फंड, शेअर मार्केटमधील गुंतवणूक, पोस्टातील गुंतवणूक व स्थावर तसेच जंगम मालमत्तेची चौकशी करावयाची असल्याने वाढीव पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात वरिष्ठांचाही सहभाग असल्याची शक्यता एसीबीने वर्तविली असून अटक झाल्यापासून दोघांनीही तपासात सहकार्य केले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
गुन्हा दाखल न करण्यासाठी साक्षीदाराकडूनही घेतले १२ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 1:14 PM