लोकमत न्यूज नेटवर्क
बोदवड जि. जळगाव : बोदवड येथील पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या धान्य दुकानातून चोरटयांनी दीड लाखांचे धान्य चोरुन नेले. यात सव्वा लाख रुपये किंमतीच्या तूर डाळीचे ३२ कट्टयांचाही समावेश आहे. गुरुवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
शहरातील जामनेर रस्त्यावर न.ह. रांका हायस्कलूच्या समोर अनिल गुलाबाचंद अग्रवाल यांचे आडत दुकान आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता नियमाप्रमाणे ते दुकान बंद करून घरी निघून गेले. गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता. दुकानाच्या समोरच्या बाजूस असलेले शटरचे कुलूप तुटलेले तसेच शटरही अर्ध्यावर उघडले आढळले. त्यांनी आत मध्ये पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. दुकानात तूरडाळीचे साठ किलो वजनाचे एकूण बत्तीस कट्टे चोरीस गेले. त्याची किंमत एक लाख १४ हजार रुपये आहे. दुकानाच्या मागील बाजूस तूरडाळ काही ठिकाणी सांडलेली आढळून आली. म्हणजेच चोरट्यांनी तूरडाळ वाहून नेल्याचे दिसत आहे.
नोव्हेंबर २०२० मध्ये याच दुकानातून जवळपास ५० क्विंटल कापूस चोरीस गेला होता. त्याचा अद्याप तपास लागलेला नाही, तोच पुन्हा या दुकानामध्ये चोरट्यानी डल्ला मारला आहे. सहा महिन्यात व्यापाऱ्याचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत अनिल अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात महिनाभरापूर्वी स्टेशन रोडवरील किराणा दुकानाच्या बाहेर असलेल्या तेलाच्या तीन टाक्या चोरीस गेल्या गेल्या होत्या. तर पंधरा दिवसांपूर्वी मनूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक नळ्या, ही चोरटे घेऊन पसार झाले होते.
याबाबत अनिल अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.