फोटो क्र.५
जळगाव : बीएचआरचा संस्थापक प्रमोद रायसोनीसह १४ संचालकांविरुध्द पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील एक गाडीभरुन कागदपत्रे बुधवारी जळगाव न्यायालयात आणण्यात आले. पोलिसांचे एक पथक सकाळीच न्यायालयात आले. ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याच्या प्रकरणात राज्यात ८१ पोलीस ठाण्यात संचालक मंडळाविरुध्द गुन्हा दाखल असून त्यातील २६ गुन्हे पुणे शहर व जिल्ह्यात दाखल आहेत. या गुन्ह्यांचे कामकाज जळगाव न्यायालयात चालविले जात आहे. त्यामुळे एकेका गुन्ह्यातील कागदपत्रे जळगाव न्यायालयात आणायला सुरुवात झाली आहे. आता नव्याने पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवरसह १० जणांना आरोपी करण्यात आले आहे.
प्रमोद रायसोनीसह संचालक मंडळावर पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे, जेजुरी, निगडी, हडपसर, सांगवी, शिक्रापुर, सिंहगड (२ गुन्हे), डेक्कन, कोथरुड, पिंपरी, चिंचवड, विश्रनाथवाडी, भोसरी, वारजे मालवडी, खडकी, भारती विद्यापीठ, मार्केट यार्ड, आळंदी,मंचर, बारामती शहर, इंदापूर, भिगवान, नारायणगाव, खेड आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. बुधवारी एक पथक सकाळीच न्यायालयात दाखल झाले. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांच्याशी या पथकाने बराचवेळ चर्चा केली. सायंकाळपर्यंत पथक न्यायालयात थांबूनच होते.
वाणी, पगारिया यांचे कामकाज लांबले
नव्याने डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रकाश वाणी व अनिल पगारिया यांनी अटकपूर्व जामीनासाठी पुणे विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. वाणी यांना तात्पुरता जामीन मंजूर केला होता. त्याच्यासह पगारिया याच्याही अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी कामकाज होणार होते, मात्र ते आता लांबणीवर पडले. दरम्यान, अटकेतील विवेक ठाकरे, सुजीत वाणी, कमलाकर कोळी यांनीही जामीनासाठी अर्ज केला आहे, त्यावर २१ डिसेंबर रोजी तर पगारिया याच्या जामीन अर्जावर ०५ जानेवारी रोजी कामकाज होणार आहे.