शेतकरी राणे यांनी दहा हजार रुपये दिल्यानंतर १२ जानेवारी रोजी वसुली अधिकारी प्रशांत साबळे हा पुन्हा राणे यांच्याकडे आला. यावेळी त्याने ठरलेल्या रकमेपैकी उर्वरित १० हजार रुपयांची मागणी केली तसेच कर्जाच्या हप्त्याचे २ लाख रुपये राणे यांना भरावयास सांगितले. तसेच बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने १२ लाखांचे कर्ज ५ लाख ४० रुपयांपर्यंत कमी करून देईन, असे सांगून त्यासाठी ठरलेल्या रकमेच्या अतिरिक्त आणखी २० हजार रुपयांची मागणी राणे यांच्याकडे केली. वसुली अधिकारी यांच्याकडून पैशांची मागणी होत असल्याने शेतकरी सुभाष राणे यांनी १२ जानेवारी रोजी प्रशांत साबळे याच्याविरोधात पुणे येथील सीबीआय अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली.
आठ दिवस ठोकला तळ
या तक्रारीनंतर पुणे येथील सीबीआय एसीबीचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी राणे यांनी केलेल्या तक्रारीची पडताळणी केली. तसेच राणे व साबळे यांच्या संभाषणात केलेल्या तक्रारीनुसार तथ्य पथकाला आढळून आले. यासाठी पुणे सीबीआयचे पथक गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून होते. पडताळणी झाल्यानंतर महेश चव्हाण यांच्यासह पथकाने १९ जानेवारी रोजी सापळा रचून चाळीसगाव शहरातून वसुली अधिकारी प्रशांत साबळे यास राणे यांच्याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात ताब्यात घेतले. यानंतर याप्रकरणी पुणे येथील सीबीआय एसीबीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन साबळे यास अटक करण्यात आली. बुधवारी त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्या. आर. जे. कटारिया यांनी एक दिवसाची कोठडी सुनावली. सीबीआयतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले. दरम्यान, संशयित साबळे यास शहरातील एका पोलीस ठाण्यात कोठडीत ठेवण्यात आले आहे.