लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पांडे चौकातील शनी मंदिरासमोरील वाहनाच्या डिकीतून १ लाख ६० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना ३० जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी अजय बिरजू गारुंगे (३२, रा.कंजारवाडा) याला गुजराल पेट्रोल पंप परिसरातून अटक केली आहे. दरम्यान, शुक्रवारी त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
अशी घडली घटना
कमलेश विशनदास लालवाणी हे गणपतीनगरातील रहिवासी आहेत. व्यवसायाने ते व्यापारी आहेत. ३० जानेवारी रोजी रात्री ९.२० वाजेदरम्यान दुचाकी (क्र. एमएच १९ सीक्यू ७७८७)च्या डिकीत १ लाख ६० हजार रुपयांची रोकड ठेऊन पांडे चौकाजवळील जागृती हॉस्पिटलसमोरील शनी मंदिराजवळ कामानिमित्त आले होते. नंतर दुचाकी पार्किंग करून शनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी ते गेले. त्या वेळात अज्ञात चोरट्याने दुचाकीची डिकी तोडून त्यातील १ लाख ६० हजार रुपये ठेवलेली पिशवी चोरून नेली होती. दोन बँकेचे एटीएम कार्ड, दुकानाच्या चाव्या व ड्रायव्हिंग लायसन्सदेखील त्यात होते. लालवाणी दर्शन घेऊन दुचाकीजवळ आले असता त्यांना डिकीतून रोकड लंपास झाल्याचे दिसून आले. शेवटी याप्रकरणी कमलेश लालवाणी यांनी जिल्हा पेठ पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली.
चोरट्याचा शोध सुरू
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाधिकारी सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या नंतर पोलीस चोरट्याच्या मागावर होते.
गुजराल पेट्रोल पंपाजवळ रचला सापळा
दरम्यान, 1 लाख 60 हजार रुपये चोरी प्रकरणात अजय बिरजू गारुंगे याचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अजय हा अहमदाबाद येथून जळगावला नातेवाइकांना भेटण्यासाठी गुरुवारी दुपारी येत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी गुजराल पेट्रोल पंप परिसरात गुरुवारी 3.30 वाजता सापळा रचला. 3.45 वाजता संशयित आरोपी गारुंगे हा ट्रकमधून उतरताच पोलिसांनी त्याला जागीच अटक केली.
30 हजारांची रोकड हस्तगत
अजय याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्या ताब्यातून ३० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेंद्र वाघमारे, सपोनि किशोर पवार, नाना तायडे, योगेश साबळे, रवी तायडे, मनोज पवार, अनिल पाटील, प्रवीण भोसले, करुणासागर जाधव यांनी केली.