जळगाव - खिडकीतून दरवाजाची कडी उघडून घरात ठेवलेले चार मोबाईल व रोकड लंपास केल्याची घटना मास्टर कॉलनीत शनिवारी मध्यरात्री घडली. याबाबत घरमालक जावेद नबी काकर यांच्या फिर्यादीवरून सोमवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
जावेद काकर हे मास्टर कॉलनीत वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री १० वाजता जेवण करून काकर कुटूंबिय झोपी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या खिडीतून मुख्य दरवाजाची कडी उघडली. नंतर घरात प्रवेश करून हॉलमध्ये असलेले १२ हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल आणि घरात ठेवलेले ८ हजार रुपये चोरून नेले.
रविवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास जावेद काकर हे झोपेतून उठल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. संशय आल्याने त्यांनी घरात पाहणी केली असता, त्यांना चारही मोबाईल व रोकड चोरीला गेल्याची दिसून आली. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी सायंकाळी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.