गस्तीवर असताना रात्री चौघांचा फोटो घेतल्याचे सहज बोलले अन्...
मयताची ओळख पटल्यानंतर घटनेच्या दिवशीच रात्री सहायक पोलीस निरीक्षक नाईक व सहकारी गस्तीवर होते. चौघेही रेकॉर्डवरील असल्याने पोलिसांनी त्यांना इतक्या रात्री कुठे फिरताहेत म्हणून जाब विचारत हटकले, एका कर्मचाऱ्याने मोबाइलमध्ये त्यांचा फोटो कैद केला होता. पोलीस निरीक्षकांच्या दालनात चर्चेत सहज एका कर्मचाऱ्याने रात्री आम्ही चार जणांना हटकले होते व त्यांचा फोटोही घेतला आहे, असा सहज विषय काढला. गवळी यांनी हाच धागा पकडून मोबाइलमधील फोटो तपासले असता त्यात एकाच्या तोंडाला बांधलेल्या रुमालावर रक्ताचा डाग आढळून आला. पाणी कुठे तरी मुरत असल्याचे गवळी यांनी येथेही हेरले आणि चौघांना चौकशीसाठी आणण्याच्या सूचना पोलिसांना केल्या. या चौघांची स्वतंत्ररीत्या वेगवेगळी चौकशी केली असता, त्यातील दोघांनी खून केल्याची कबुली दिली. राऊत हा पानटपरी फोडत असल्याच्या संशयावरून त्यातील दोघांनीच त्याला मारल्याचे निष्पन्न झाले. दारूच्या नशेतच हे कृत्य केल्याची कबुलीही मारेकऱ्यांनी दिली. महेश विश्वनाथ महाजन (२४), योगेश ऊर्फ भय्या रमेश धोबी (३०), विकास गोपाळ महाजन (३०) व विनोद विठ्ठल सातव या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
कोट...
मयताचे शर्ट व आरोपींच्या तोंडावरील रुमालावर असलेला रक्ताचा डाग यातूनच तपासाचे धागेदोरे मिळाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मयताची ओळख पटली आहे. तेच मोठे आव्हान होते. चौकशीत इतर तांत्रिक बाबीही जुळून आल्या असून तो मोठा पुरावा आहे. सर्व सहकाऱ्यांनी सलग २४ तास यात झोकून दिले, त्यामुळे हे सामूहिक यश आहे.
- चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक