फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पाच मिनिटात येतो, असे मित्रांना सांगून गेलेला श्याम शांताराम कोळी (वय ३६ रा. असोदा, ता. जळगाव) या तरुणाचा मंगळवारी सकाळी भादली ते शेळगाव दरम्यान रस्त्यावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्याच्या डोक्यातून रक्त आलेले आहे तर दुचाकीला नील गायचे केस आढळून आल्याने नील गाईच्या धडकेत श्याम ठार झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रारंभी या घटनेविषयी तर्क-वितर्क लावले जात होते. दोन दिवसांपूर्वीच आसोदा येथील कोळी परिवारातील मायलेकाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा श्यामचा अपघाती मृत्यू झाल्याने गाव सुन्न झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम हा रात्री साडेबारा वाजतापर्यंत असोदा गावात मित्रांसोबत होता. १५ जून रोजी जळगावच्या मित्राचा वाढदिवस असल्याने गावात बॅनर लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी काही बॅनर लावल्यानंतर मी पाच मिनिटात जाऊन येतो, असे श्यामने मित्रांना सांगितले. तेथून तो भादलीकडे दुचाकीने गेला. बराच वेळ झाला तरी परत आला नाही. घरी गेला असावा म्हणून मित्रांनी त्याची वाट पाहिली नाही. मंगळवारी सकाळी भादलीतून जळगावला येणाऱ्या काही लोकांना श्याम याचा मृतदेह शेळगाव रस्त्यात दिसून आला. डोक्यातून रक्त आलेले होते, त्यामुळे या घटनेची बातमी असोदा गावात वाऱ्यासारखी पसरली. श्यामचे वडील शांताराम कोळी, सरपंचाचा मुलगा सागर दिलीप कोळी व विनोद रमेश कोळी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
डोक्यातून रक्तामुळे घातपाताचा संशय
दरम्यान, श्याम यांच्या डोक्यातून रक्त निघाल्याने घातपाताचा संशय आहे की काय, असे प्रारंभी वाटले. त्यानंतर घटनास्थळावर दोन्ही मोबाइल व दुचाकीला नीलगायचे केस लागल्याचे दिसून आले, त्यामुळे नीलगायच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्हा रुग्णालय शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह असोदा गावी नेण्यात आला.
मध्यरात्री भादलीकडे का गेला?
श्याम हा मध्यरात्री घरी जाण्याऐवजी भादली, शेळगावकडे का गेला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. घटनास्थळावर त्याचे दोन्ही मोबाइल आढळून आलेले आहेत. मंगळवारी मित्राचा वाढदिवस साजरा करणे हे फक्त एक स्वप्नच राहिले. श्याम हा मनमिळावू व लोकांच्या मदतीला धावून जाणारा मुलगा होता. त्याच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात वडील शांताराम रामदास कोळी, आई कलाबाई, पत्नी सीमा, मुलगा हेमंत (वय ६) वैष्णवी (वय ३)व एक बहीण असा परिवार आहे. श्यामच्या दोन बहिणीचे यापूर्वी निधन झाले आहे. श्याम मजुरीचे काम करायचा. श्यामचे वडील ग्रामपंचायतीत शिपाई आहेत.
--