चाळीसगाव, जि.जळगाव : 'साप' पकडणे हा त्याचा छंद. मात्र उदरनिवार्हाचे कोणतेही साधन नसल्याने 'पदरझळ' सोसून छंद जोपासणे त्याला अवघड झाले आहे. याच हतबलतेतून त्याने रविवारी सोशल माध्यमातून आपली होत असलेली फरफट 'मी आता साप पकडणार नाही... थोडक्यात लॉकडाऊन' अशा शब्दात व्यक्त केली. त्याला वनविभागाकडून 'सर्पमित्र' असल्याचे कार्ड मिळणे अत्यावश्यक आहे. सर्पमित्र मयूर चंद्रकांत कदम याच्या पोस्टने चाळीसगाव पंचक्रोशीतील समाजमन ढवळून निघाले आहे.येथील रेल्वेस्थानकाच्या पलिकडील भागात असणा-या पंचशील नगरात मयूर आपल्या आई - वडील व भावंडांसह राहतो. गेल्या सहा-सात वर्षापासून त्याला साप पकडण्याचा छंद लागला. साप पकडण्यासाठी कुणीही बोलावले तरी क्षणाचाही विलंब न करता पोहचतो. मात्र गेल्या काही दिवसात त्याला येणा-या अडचणींमुळे तो व्यथित झाला आहे. याच वेदनेतून त्याने यापुढे साप पकडणार नाही, असा निर्णय घेतला आहे. तशी त्याची भावनिक पोस्ट रविवारी सोशल माध्यमावर चांगलीच व्हायरल झाली आहे.सहा हजाराहून अधिक सापांना जीवदानबारावी उत्तीर्ण मयूर व त्याचा लहान भाऊ पंकज या दोघांना साप पकडण्याचा छंद आहे. वडिल चंद्रकांत कदम वेल्डींगचे दुकान चालवितात, तर आई गृहिणी आहे. हातावर पोट असणारं हे कुटुंंब असून मयुरने छंद म्हणून पकडलेल्या पाच हजाराहून अधिक सापांना जंगलात सोडून जीवदान दिले आहे. साप पकडण्यासाठी दुचाकीवर जाणे, स्वत: पेट्रोलचा खर्च करणे... काही मित्रांच्या मदतीने त्याचे हे साप पकडणे सुरू आहे.लॉकडाऊनमध्ये २०० साप पकडलेसध्या लॉकडाऊन सुरू असले तरी उन्हाच्या तीव्रतेने सापांचे बिळाबाहेर पडणे सुरू झाले आहे. गेल्या २७ दिवसात मयूरने २०० साप पकडले आहेत. मात्र साप पकडताना त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले जात नाहीपोलिसांकडून सर्पमित्र कार्ड दाखविण्याची मागणीवडिलांचा व्यवसाय बंद असल्याने कुटुंंबावर उपासमारीची वेळ आली आहे.वेळ कोणतीही असो. मयूर साप पकडण्यासाठी सारखी धावाधाव करतो. याच उद्विग्नेतून त्याने साप पकडणार नसल्याची पोस्ट व्हायरल केली आहे.साप पकडणे जिकिरीचे आहेच. पण त्या अगोदर येणाऱ्या अडचणी मोठ्या आहेत. साप पकडताना त्याने दंश केला तर सुरक्षा म्हणून माझ्याकडे काहीही नाही. सर्पमित्राचे कार्ड मिळाल्यास काही प्रश्न निश्चित सुटणार आहे. अधिक सापांना जीवदान देणेही शक्य होईल. गेल्या सहा वर्षांपासून विना मोबदला मी हे काम करतोय. आता मात्र शक्य होत नाही.-मयूर चंद्रकांत कदम, सर्पमित्र, चाळीसगाव