जळगाव : पायी चालणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या माया गँगच्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पकडले. त्यातील अभिजित छोटू पाटील (१९,रा.चौघुले प्लॉट, जळगाव) याने चोरलेला मोबाईल विक्री करुन प्रेयसीला पाचशे रुपयाची चांदीची अंगठी घेतली असून ही अंगठीही त्याच्याजवळ आढळून आली. दरम्यान, तिघांकडून काही मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.
शहरात गेल्या काही दिवसापासून पायी चालणाऱ्या लोकांच्या हातातून मोबाईल लांबविणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. एकही दिवस असा नाही की घटना घडली नाही. घटना घडत असताना दुचाकीस्वार मुले हाती लागत नव्हते. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना या टोळीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या पथकाने विविध भागात पाळत ठेवून संशयितांना हेरले. एकाच दुचाकीवर तीन जण असल्याचे अनेक घटनावरुन उघड झाले होते. अभिजित छोटू पाटील याच्यासह त्याच्याच भागात राहणारे आणखी दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या हाती लागले.
शूट आऊट लोखंडवाला पाहिला..अन् गुन्ह्याकडे वळला
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये दोन अल्पवयीन मुलांना छोटा माया व मोठा माया असे म्हणतात. मोठा मायाने शूट आऊट लोखंडवाला हा चित्रपट पाहिला. त्याला तो इतका भावला की त्याने हा चित्रपट तब्बल १५० वेळा पाहिला व त्यातूनच त्याने गुन्हेगारीकडे पाऊल ठेवले, ही कबुली त्याने पोलिसांना दिली. दुसरा मित्र सोबतच रहात असल्याने त्याला छोटा माया नाव ठेवण्यात आले. शनी पेठ भागात या तिघांची दहशत आहे. दोघांचे वडील रिक्षा चालक तर एकाचे दूधाचे टँकरवर चालक आहेत. ८ ते १० पर्यंतच तिघांचे शिक्षण झालेले आहे. छोटा माया पुण्यात बाहेरुन दहावीचे शिक्षण करणार आहे तर मोठा माया औरंगाबाद येथे एका मॉलमध्ये कामाला होता, मात्र लॉकडाऊनमुळे तो घरी आला. अभिजीत हा ३०० रोजाने टेन्ट हाऊसवर कामाला आहे.
गांजा व स्टीकफास्टची नशा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघ जण गांजा व स्टीकफास्ट या सोल्युशनची नशा करतात. नशा झाल्यानंतर एकाच दुचाकीवर रस्त्याने जाणाऱ्या लोकांचे मोबाईल लांबवितात. चोरलेले हे मोबाईल अगदी कमी किंमतीत विक्री करतात. रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे. या नशेमुळे छातीत वेदना होतात व किडणीलाही त्रास होतो. बंद करायची इच्छा होते, परंतु त्यांच्यावाचून राहिले जात नसल्याचेही या तिघांनी सांगितले. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी तिघांना नशा व चोरीपासून अलिप्त राहण्याबाबत अर्धा मार्गदर्शन केले असता त्यांनी हे धक्कादायक अनुभव सांगितले.