जळगाव : सुभाष चौक अर्बन को. ऑप. क्रेडीत सोसायटीतर्फे बेकायदेशीररित्या २३ कोटी रूपयांचे कर्ज देण्यात आले असून हे कर्ज घेण्यासाठी मालमत्तेचे बनावट मुल्यांकन दाखला देण्यात आल्याबाबतची तक्रार जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्याकडे अजय ललवाणी यांनी केले आहे. या तक्रारीची दखल घेवून तालुका उपनिबंधकांना चौकशीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मौजे मेहरूण येथील सर्वे नं. ४१३ मधील प्लॉट नंबर १५९ व इतरही मिळकती संदर्भात औरंगाबाद खंडपीठ येथे सिव्हील अप्लिकेशन प्रबंलित आहे़ सिव्हिल अप्लिकेशन प्रलंबित असताना सुभाष चौक अर्बन को. ऑप. क्रेडीत सोसायटीतर्फे त्या मिळकतीवर बेकायदेशीररित्या २३ कोटी रूपयांचे कर्ज दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, ज्यांनी कर्ज घेतले त्यांनी मालमत्तेचा मुल्यांकन दाखलाही बनावट दिला असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. मिळकतीवर १७ कोटी २५ लाख कर्ज श्री डेव्हलपर्स आणि श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.च्यावतीने श्रीराम खटोड यांनी घेतले आहे. तर ५ कोटी ७५ लाख रूपयांचे कर्ज श्रीकांत खटोड यांनी घेतले आहे. श्रीकांत खटोड हे सोसायटीचे अध्यक्ष असून श्रीराम खटोड यांचे भाऊ आहेत. तर खटोड यांनी स्वत: च्या फर्म/कपंनीसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे २३ कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच मुल्यांकन कागदपत्रांची चौकशी व्हावी व सोसायटीच्या पदाधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अजय ललवाणी यांनी तक्रारीतून केली होती. या तक्रारीची जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने दखल घेवून तालुका उपनिबंधक यांना या तक्रारीची संपूर्ण चौकशी करून आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. तसे कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे सांगितले आहे.