जळगाव : उघड्या डीपीतील फ्यूज तारांना स्पर्श करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैलास नारायण भांगे (४६,रा. साई इजारा, ता. महागाव,जि.यवतमाळ) याला वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारी व बीडीडीएसच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन वाचविल्याची घटना शनिवारी सायंकाळी सात वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घडली. फक्त काही सेंकद उशीर झाला असता तर भांगे यांचा मृतदेहच उचलून नेण्याची वेळ आली असती. दरम्यान, भांगे यांना जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारी शितल पाटील या शनिवारी सायंकाळी सात वाजता बसस्थानकाच्या बाहेर ड्युटीवर असताना कैलास भांगे हे बसस्थानकाकडून आले व मनपाच्या स्ट्रीट लाईटच्या पोलवरील उघड्या डीपीजवळ गेले व तेथे संताप व्यक्त करीत असल्याचे शितल पाटील यांच्या लक्षात आले. त्याचवेळी बीडीडीएसचे कर्मचारी प्रकाश महाजन सायकलीने जात होते. पाटील या त्यांना हा प्रकार सांगत असताच भांगे हा तारांना स्पर्श करण्याची तयारी करीत असल्याचे जाणवताच दोघांनी तत्काळ तेथे धाव घेतली. तार हातात पकडणार तितक्यात महाजन यांनी भांगे यांना जोरदार धक्का मारला, त्यातून सावरुन भांगे यांनी पुन्हा तारांजवळ धाव घेतली. हा आत्महत्येचाच प्रकार असल्याची खात्री पटल्यावर महाजन व पाटील दोघांनी मिळून त्याला पकडून रस्त्यावरील लोकांच्या मदतीने बाजुला घेतले. वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर, सुनील निकम, योगेश पाटील, किरण मराठे व महेश अहिरे यांनी भांगेला पकडून वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणले, मात्र तेथेही या सर्वांना झटका देऊन पलायन करण्याचा प्रयत्न केला.
मला जगायचंच नाही...
पोलिसांनी भांगे याची चौकशी केली असता, उस तोड करणाऱ्या कंत्राटदाराकडील ट्रॅक्टरवर चालक असून काही तरी वाद झाल्याने सर्वांनीच तेथून पलायन केले. घरी जायला भाडे नाही, कटकटी सुरु झाल्या म्हणून संतापात आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे भांगे सांगत होते. तीन लहान मुले आहेत, काय करावे सूचत नाही असेही ते सांगत होते. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास शेंडे, महेंद्र बागुल, उमेश पाटील व इतर सहकाऱ्यांनी त्यांना पोलीस वाहनात बसविण्याचा प्रयत्न केला असता तेव्हाही त्यांनी झटका देऊन पलायनाचा प्रयत्न केला. मानसिक स्थिती ढासळल्याने त्यांना काहीच सूचत नव्हते. पोलीस ठाण्यात नेऊन तेथे चौकशी सुरु होती.