जळगाव : बीएचआर पतसंस्थेचे संचालक मंडळ तसेच अवसायक या दोघांनीही ठेवीदारांची फसवणूक केली असून, यात आता न्यायासाठी केंद्र व राज्य सरकारला पार्टी करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय ठेवीदारांनी घेतला आहे. त्यासाठी रविवारी ठेवीदारांची ऑनलाइन बैठक झाली.
महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष उमेश मुंदडा (नाशिक) यांनी रविवारी दुपारी ४.३० ते ७.३० यादरम्यान ऑनलाइन बैठकीचे आयोजन केले होते. यात नाशिक, मालेगाव, उस्मानाबाद, पुणे, येवला, परभणी, धर्माबाद, सांगली यासह राज्यभरातील २५० ठेवीदार सहभागी झाले होते. या ऑनलाइन चर्चेत अवसायक जितेंद्र कंडारे याच्याविषयी ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केली. यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष उमेश मुंदडा यांनी ठेवी परत मिळविण्यासाठी राज्यभरातील ठेवीदारांनी संघटित होऊन केंद्र व राज्य सरकारविरोधात याचिका दाखल करून पार्टी करावे, असा निर्णय घेण्यात आला. लवकरच समितीची बैठक नाशिक, सटाणा येथे घेण्यात येणार असल्याचे अशोक मंडोरे यांनी स्पष्ट केले.