सुविधा : सप्टेंबर पर्यँत प्रशिक्षण केंद्राची प्रकिया सुरू होणार
जळगाव : गेल्या वर्षी जळगावला मंजूर झालेल्या वैमानिक प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा ३१ मे रोजी उघडण्यात आल्या असून, या मध्ये देश-विदेशांतील नामांकित संस्थांनी निविदा भरल्या होत्या. यामध्ये दिल्ली येथील ''स्कायनेक्स एरिओ प्रा. लि.'' या वैमानिक प्रशिक्षण संस्थेला जळगाव येथील वैमानिक प्रशिक्षण केंद्र चालविण्याची संधी देण्याची आली आहे, तर सप्टेंबरमध्ये प्रशिक्षण केंद्राची प्रकिया सुरू होण्याची शक्यता आहे.
भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने गेल्या वर्षी देशभरात आठ ठिकाणी नवीन वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची घोषणा केली होती. यात महाराष्ट्रातील एकमेव जळगाव विमानतळाचाही समावेश होता. दरम्यान, देशभरातील हे वैमानिक प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये यासाठी निविदा काढल्या होत्या. कोरोनामुळे मात्र प्राप्त झालेल्या निविदाप्रक्रिया उघडण्याला विलंब झाला होता. अखेर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ३१ मे रोजी या निविदा उघडल्या.
यात देशभरातील विविध नामांकित संस्थानी निविदा भरून, जळगावचे वैमानिक प्रशिक्षण केंद्र चालविण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अटी-शर्तीमध्ये बसणाऱ्या दिल्ली येथील ''स्कायनेक्स'' या संस्थेची भारतीय विमानतळ प्राधिकरणाने निवड निश्चित केली आहे. तसेच देशातील इतर ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्राच्याही निविदा उघडण्यात आल्या असून, एशिया-पॅसिफिक, जेटझिव्ह, रेडबर्ड या नामांकित संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यांना याबाबतचे भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे अधिकृत निवड पत्रही देण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने निश्चित केलेल्या प्रशिक्षण संस्थांना वैमानिक प्रशिक्षण धोरणानुसार विमानाच्या सुरक्षिततेसाठी अद्ययावत सुरक्षा यंत्रणा नियुक्त करणे, विमानावर प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवी वैमानिकांची नियुक्ती करणे, तसेच संस्थेत अद्ययावत उपकरणे ठेवणे आदी नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
इन्फो :
जळगाव विमानतळावरील वैमानिक प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने प्राप्त झालेल्या निविदा ३१ मे रोजी उघडल्या. यात जळगाव येथील वैमानिक प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी दिल्ली येथील ''स्कायनेक्स एरिओ'' या संस्थेची निवड करण्यात आली आहे. सप्टेंबरपर्यंत या प्रशिक्षण केंद्राच्या निर्माण प्रकियेला सुरुवात होईल.
उन्मेश पाटील, खासदार, जळगाव लोकसभा मतदारसंघ