लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिकांना अजूनही गांभिर्य समजलेले दिसून येत नाही. प्रशासनाकडून वेळोवेळी मास्क वापरण्याचे आवाहन केले जात असतानाही नागरिक मास्कचा वापर करत नाहीत. गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली टॉवर चौकात मास्क न घालणाऱ्या १९५ जणांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला, विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान ज्यांनी मास्क घातला नाही. अशा नागरिकांकडून कारवाई करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांनाच धमकी दिली जात होती. नियम मोडायचा आणि वरून शिरजोरी दाखवणाऱ्यांना मनपाच्या पथकाने चांगलाच इंगा दाखविला.
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी शुक्रवारी टॉवर चौकात मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम आखली. टॉवर चौकात थांबून मोटारसायकल व पायी जाणाऱ्या ज्या नागरिकांनी मास्क घातला नाही, अशांवर जोरदार कारवाई करण्यात आली. मनपासह पोलिसांच्या पथकाने देखील बहिणाबाई उद्यान परिसरात मास्क न घातलेल्यांवर कारवाई केली.
सूचना दिल्यानंतरही शिरजोरी
ज्यांनी मास्क घातला नाही अशांना मनपा उपायुक्तांनी सुरुवातीला समजूत घालून मास्क घालण्याची विनंती केली. मात्र, या विनंतीकडे दुर्लक्ष करत उपायुक्तांशीच वाद घालण्याचा प्रयत्न केला, अशांना शहर पोलीस ठाण्यात नेवून काही वेळ बसवून ठेवण्यात आले. तसेच मास्क घालणाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. अनेकांनी मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.
पथक पाहताच अनेकांनी बदलविला रस्ता
टॉवर चौकात मनपाचे पथक असल्याने बळीराम पेठकडे जाणाऱ्या मात्र मास्क न घातलेल्यांनी दुरुनच पथक दिसताच रस्ता बदलवून घेतला. अशा रस्ता बदलविणाऱ्यांमागे देखील मनपाच्या पथकाने पिच्छा करून कारवाई केली. यासह बळीराम पेठ, सुभाष चौक भागात जावून देखील उपायुक्तांनी कारवाई केली.
फुले मार्केटमध्ये केली पाहणी
उपायुक्तांनी फुले मार्केटमध्ये जावून देखील पाहणी केली. उपायुक्तांचे पथक येताच लहान-मोठ्या हॉकर्सने साहित्य घेवून पळ काढला. उपायुक्तांनी प्रत्येक मजल्यावर जावून दुकानदारांना मास्क वापरण्याचा व गर्दी टाळण्याचे आवाहन केले. यासह उपायुक्तांनी काही बसेस थांबवून बसेसमधील प्रवाशांना देखील मास्क घालण्याची विनंती केली.