कोरोना योद्यांचा सत्कार
जळगाव : शहरातील जय दुर्गा माध्यमिक विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोरोना योद्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी महापौर जयश्री महाजन यांच्यासह ललित धांडे, रघुनाथ सोनवणे, नाना पाटील, अरुणा कुमावत, सुरेंद्रसिंग उदावन्त आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
विना परवानगी झाड तोडल्या प्रकरणी आयुक्तांकडे तक्रार
जळगाव : शहरातील शिवाजी नगरात एका व्यक्तीने मनपाची कुठलीही परवानगी न घेता शनिवारी घरासमोरील आंब्याचे झाड तोडले. विशेष म्हणजे पर्यावरण दिनीच हे झाड तोडल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी स्थानिक नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली आहे.
कोरोनामुळे जनरल तिकीटला बंदीच
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना काळात ज्या एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. त्या प्रत्येक गाडीला विशेषचा दर्जा दिला आहे. तसेच कोरोना संसर्गामुळेच सर्व प्रवाशी गाड्यांना जनरल तिकीट बंद असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तसेच विशेष दर्जामुळे या गाड्यांना तिकीट आरक्षण सक्तीचे करण्यात आले असून, रेल्वे बोर्डाच्या सुचनेनंतरच जनरल तिकीट देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
जतूंनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी
जळगाव : शहरातील सुभाष चौक परिसरात अनियमित साफसफाई अभावी मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने या परिसरात जतूंनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.