लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली असून, यामुळे सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन ही संख्या २०४६ वर आली आहे. शनिवारी १६४ नवे रुग्ण आढळून आले असून, त्या तुलनेत २३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूमध्ये गेल्या दोन दिवसांपासून घट झाली आहे. शहरात एका बाधिताच्या मृत्यूची शनिवारी नोंद करण्यात आली आहे.
शहरातील रुग्णसंख्र्या सुरुवातीला ४०० पर्यंत पोहोचली होती. मात्र, ही संख्या गेल्या दोन आठवड्यांपासून घटली असून, आता सरासरी दीडशे ते २०० रुग्ण शहरात आढळून येत आहेत. चाचण्यांच्यात तुलनेत बाधितांचे प्रमाणही ४० टक्क्यांवरून थेट १० ते १५ टक्क्यांवर आल्याचे दिलासादायक चित्र आहे. मृत्यूची संख्या सातत्याने पाचपेक्षा अधिक नोंदविण्यात येत होती; मात्र, ती घटून आता दोन दिवसांत दोन बाधितांचे मृत्यू झाले आहेत. त्या तुलनेत अन्य तालुक्यांत मृतांची संख्या काहीशी वाढत आहे. शनिवारी अँटिजेन ८१०१ चाचण्या झाल्या, तर आरटीपीसीआरचे २४१४ अहवाल समोर आले. यात अनुक्रमे ८२५ व २२१ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
रुग्णांची संख्र्या अशी
एकूण सक्रिय रुग्ण १०९४६
लक्षणे असलेले रुग्ण ३२८०
लक्षणे नसलेले रुग्ण ७६६६
ऑक्सिजनवरील रुग्ण १७२९
आयसीयूतील रुग्ण ७९८
अडीच तासांत मृत्यू
बोदवड येथील एका ३८ वर्षीय बाधित महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यानंतर अडीच तासांत या महिलेचा मृत्यू झाला. उशिरा रुग्णालयात दाखल होणे, बाधित असून न्यूमोनिया असणे अशी काही कारणे मृत्यूमागे नोंदविण्यात आली आहेत. या महिलेला गंभीर अवस्थेत दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. साडेचारच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला.