लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : श्वानांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यश सोनवणे या मुलावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सुधारली असून, दुसऱ्या दिवशी हा मुलगा कक्षात बसून होता. मुलाची प्रकृती सुधारल्याने पालकांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले आहे. भटक्या श्वानांनी यशच्या कानाचा लचका तोडला होता. यशच्या कानला दहा टाके पडले आहेत.
यशला आवश्यक ते इंजेक्शन व औषधोपचार देण्यात आले असल्याचे वडील महेंद्र सोनवणे यांनी सांगितले. काँग्रेसचे सरचिटणीस अजाबराव पाटील यांनी कठीण काळात मदत केल्याचेही ते म्हणाले. यासह अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वारंवार प्रकृतीविषयक विचारणा करून चांगले उपचार कसे मिळतील यासाठी सहकार्य केले.
श्वानदंशाच्या घटना वाढल्या.. पालकांनो, काळजी घ्या..
गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांना कुत्रे चावण्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रामणात वाढ झाली आहे. दररोज किमान पाच ते सहा बालकांवर उपचार केले जात आहेत. यासह एकत्रित दिवसाला कुत्रे चावण्याच्याच २५ ते ३० केसेस येत असल्याची माहिती आपत्कालीन विभागातून समोर आली आहे. अशा परिस्थितीत पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असून, कुत्रे चावल्यानंतर तातडीने उपचार गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.