लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रिया यंदाही आरोग्य विभागाच्या बदल्यांवरून झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे. काही कर्मचाऱ्यांनी माध्यमांना या बदल्यांबाबत भेदभाव झाल्याचा तसेच पदाधिकाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने या बदल्या झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेला आरोग्य विभाग आता बदल्यांमुळे चर्चेत आला आहे.
आरोग्य विभागातील पदोन्नतीचा विषय अद्यापही मार्गी लागलेला नसून मनुष्यबळाचा मुद्दा उपस्थित करून विभागाकडून वेळ मारून नेली जात आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून विविध सभांमध्ये गाजणारा हा मुद्दा मार्गीच लागत नसल्याने यंत्रणा नेमकी करतेय काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोग्य विभाग अशक्तपणे काम करीत असेल तर आरोग्य यंत्रणा मजबूत होणार कशी, असाही प्रश्न विचारला जात आहे. विविध मुद्द्यांवरून सभांमध्ये नेहमी आरेाग्य विभागच चर्चेत राहत असल्याने वरिष्ठांपुढे आता करायचे काय? हा पेच निर्माण झाला आहे. त्यातच शनिवारी आरोग्य विभागातील ४९ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात जळगावात बदलीसाठी काही आरोग्य सेविका रडल्याची माहिती आहे. मात्र, दोनच जागा रिक्त असल्याने त्यात दिव्यांग तसेच अत्यंत गरजेच्या कर्मचाऱ्यांना संधी दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. समुपदेशनाने या बदल्या होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी यात होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपावर कर्मचाऱ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गंभीर बाब म्हणजे पदाधिकारी व सदस्यांना विचारून बदल्या होत असल्याचा आरोपही काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. बदल्यांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार नसून दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्राधान्याने बदली देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिले आहे.
अशा झाल्या एकूण बदल्या
प्रशासकीय ३१
विनंती १६०
आपसी ४
तीन दिवस तालुकास्तरावर बदल्या
कोरोनामुळे जून महिन्यात रद्द करण्यात आलेली बदली प्रक्रिया जुलै महिन्यात राबविण्यात आली. यासाठी जिल्हा परिषद स्तरावरील बदल्यांसाठी विभागानुसार २३ व २४ जुलैला समुपदेशन घेण्यात आले. २७ ते ३१ जुलैपर्यंत आता तालुकास्तरावर बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.