लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय आरोग्य यंत्रणेत आताही पूर्ण गाडा हा केवळ ५० टक्के मनुष्यबळावर ओढला जात आहे. यात आरोग्य केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याने बीएएमएस डॉक्टरांच्या तदर्थ म्हणून नियुक्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाच्या मुद्द्यावर केंद्रीय समितीनेही बोट ठेवले आहे. जिल्ह्यात १३२ कोविड रुग्णालये असून २५ कोविड सेंटर आहेत. खासगी कोविड रुग्णालयात प्रत्येकी ५ ते ७ आरएमओ तर सर्व रुग्णालयांमध्ये २०० पर्यंत कन्सलटंट असल्याची माहिती आहे. शासकीय यंत्रणेत हीच संख्या ५० टक्के आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२० परिचारिका आहेत. ही संख्या खूपच कमी असल्याने आहे त्या यंत्रणेवर ताण वाढला आहे. मध्यंतरी या ठिकाणी डॉक्टरांच्या संख्येबाबतही मोठी समस्या निर्माण झाली होती. कुशल मनुष्यबळ पुरेसे नसणे यामुळे आरोग्य सेवेत अडचणी असल्याचा मुद्दा नुकताच केंद्रीय समितीने मांडला होता.