लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडची तिसरी लाट थोपविण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर असताना जिल्ह्यातील आदिवासी भागात लसीकरण मोहीम राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाची चांगलीच कसरत होत आहे. यावल तालुक्यातील मोहमांडली येथे नुकतेच आरोग्याचे पथक गेले; मात्र कोणीही लस घ्यायला तयार होत नव्हते, केवळ उपसरपंच व एक डॉक्टर अशा दोघांनीच या ठिकाणी लस घेतली व अखेर आरोग्याचे पथक माघारी परतले. अशी स्थिती असताना गावांमध्ये शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होणार कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आदिवासी भागातील गावांमध्ये आताही लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असून अनेक गावांमध्ये तर लस घेतल्यानंतर अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आम्ही लस घेणार नाही, असे सांगून लस नाकारण्यात येत असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले आहे. आदिवासी भागात लसीकरण मोहीम तीव्र करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात गेल्यावेळी यावल, रावेर, चोपडा या भागात अधिक लसींचे डोस देण्यात आले होते; मात्र आरोग्य पथक गावात गेल्यानंतर या ठिकाणी लसीकरणाला प्रतिसादच मिळत नसून ग्रामस्थ भीतीपोटी येत नसल्याचे चित्र आहे.
शंभर टक्क्यांसाठी हे नियोजन
ज्या गावांमध्ये, पाड्यांवर शंभर किंवा कमी लोकसंख्या आहे, अशा ठिकाणी शंभर डोस घेऊन पथकाने जाऊन एकाच दिवसात शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे एक नियोजन हाती घेतले जात आहे. संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राला साठा मिळाल्यानंतर कमी लोकसंख्येच्या ठिकाणी पूर्ण साठा देऊन लसीकरण पूर्ण करावे, अशा हालचाली आरोग्य विभागाच्या सुरू आहेत.
डोस कमी लसीकरण जास्त
जिल्ह्याला प्राप्त डोसपेक्षा अधिक लसीकरण करण्यात जिल्हा आरोग्य विभागाला यश आले आहे. एका व्हायलमध्ये बारा डोस दिले जातात, यापैकी दोन डोसची मोजणी ही वेस्टेजमध्ये होते. मात्र, जिल्ह्यात पूर्ण डोस वापरात आणून एकूण लसींपेक्षा अधिक डोस दिले गेले आहेत. डोस वाया जाऊ न देता लसीकरणावर भर दिला जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले.
अशी आहे स्थिती
प्राप्त डोस: ७ लाख ९८ हजार ६८०
किती लोकांना लस दिली : ८ लाख ५५ हजार ४२
लस वाया जाण्याचे प्रमाण : -७.८१ टक्के