महिंदळे (ता. भडगाव) : पळासखेडे येथे महिंदळे, पळासखेडे व रूपनगर या गावांसाठी गेल्या पंचवीस ते तीस वर्षे जुने रुग्णाच्या सेवेसाठी आरोग्य केंद्र उभारण्यात आले होते. परंतु, या आरोग्य केंद्राचा रुग्णांना काहीच उपयोग होत नसल्यामुळे हे आरोग्य केंद्र शेवटच्या घटिका मोजत आहे. आरोग्य केंद्राचा परिसर घाणीच्या साम्राज्याने व्यापला आहे. येथील दारे-खिडक्या तोडून टाकल्या आहेत. कायमस्वरूपी आरोग्य केंद्र बंद राहत असल्यामुळे टवाळखोरांनी या आरोग्य केंद्राची नासधूस केली आहे.
येथे होते कोविड लसीकरण
आरोग्य केंद्राचेच आरोग्य धोक्यात आलेल्या व परिसर पूर्ण घाणीच्या साम्राज्याने वेढलेल्या भागात आरोग्य केंद्र सुरू आहे. महिंदळे, पळासखेडे, रूपनगर या गावांचे कोविड लसीकरण या लसीकरणासाठी एक खोली तयार करून या घाणीच्या साम्राज्यात नाइलाजाने आरोग्य सेवकांना लसीकरण करावे लागत आहे व लस घेणाऱ्यांनाही तसेच गटारीच्या घाणेरड्या वासात बसावे लागते.
घाणीच्या विळख्यात अडकले आरोग्य केंद्र
रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ व सुंदर असायला हवा. पण, या आरोग्य केंद्राच्या आजूबाजूला सांडपाण्याची गटार, उकिरडे व गावाचा केरकचरा या आरोग्य केंद्राच्या परिसरात साचला आहे. आरोग्य केंद्राच्या सर्व दारे, खिडक्या अज्ञातांनी तोडून टाकल्यामुळे हा जणू गुरांचा गोठाच झाला आहे. येथे डुकरे, कुत्रे यांचेच वास्तव्य असते. संरक्षक भिंत नसल्यामुळे गावकरी आपली गुरे आरोग्य केंद्राच्या परिसरात बांधतात. या इमारतीचा उपयोग गुरांचा चारा भरण्यासाठीही होतो. शासनाने या इमारतीकडेही लक्ष द्यावे व नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करावा.
हे आरोग्य केंद्र फक्त कागदावरच
परिसरातील जनतेसाठी आरोग्य केंद्र आहे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य केंद्राची दैना झाल्यामुळे व येथे डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांना मनस्ताप सहन करून भडगाव किंवा पिंपरखेड आरोग्य केंद्रात जावे लागते. या आरोग्य केंद्रात रुग्णांना सर्व सेवा उपलब्ध झाल्यास रुग्णांना खासगी उपचार करावा लागणार नाही. या जीर्ण इमारतीच्या कामासाठी ग्राम पंचायत प्रशासनाकडून वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
या आरोग्य केंद्राची जीर्ण झालेल्या इमारतीऐवजी नवीन मंजूर व्हावी व संरक्षक भिंत नसल्यामुळे गावकऱ्यांनी येथे घाणीचे साम्राज्य निर्माण केले आहे. यासाठी ग्राम पंचायतीमार्फत जिल्हा प्रशासनाला दिले होते. परंतु, त्यांनी ५ हजार चाै. फूट जागा नवीन इमारतीसाठी हवी असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार आम्ही जागा उपलब्ध करून दिली आहे. तसा ठरावही जिल्हा प्रशासनास सादर केला आहे. तरी त्वरित या जीर्ण व मोडकळीस आलेल्या इमारतीसाठी निधी मंजूर होईल, अशी अशा आहे.
-सुनील सरदार वंजारी,
सरपंच, पळासखेडे, ता. भडगाव
===Photopath===
090621\09jal_3_09062021_12.jpg
===Caption===
पळासखेडे, ता. भडगाव येथील आरोग्य केंद्राची झालेली दयनीय अवस्था.