कुंदन पाटील / ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 28 - राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत 117 पैकी 60 विद्याथ्र्यांना हृदयआजाराची लक्षणे दिसून आली आहेत. विशेष उपचारातून या बालहृदयांना सशक्तपणाचा डोस देण्यासाठी आरोग्य प्रशासनाने पाऊले उचलल्याने शासनाचा हा कार्यक्रम फळास येत असल्याचे स्पष्ट होत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी आणि शाळकरी विद्याथ्र्यांची आरोग्य तपासणीसाठी तालुकानिहाय मोहिम राबविण्यात आली. आजारांचे निदान झाल्यावर काही विद्याथ्र्यांवर तालुका पातळीवर उपचाराची दिशा निश्चित करण्यात आली. हृदयरोगाशी संबंधित 117 विद्याथ्र्यांची जळगावी डॉ.विजय बाविस्कर यांच्या रूग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी ठाणे येथील बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ.आशुतोष सिंग, डॉ.दिनेश गुप्ता, करण छत्री यांच्या उपस्थितीत विशेष शिबिर आयोजित केले. तपासणीनंतर 117 पैकी 60 विद्याथ्र्याच्या हृदयरोगावर ठाण्यात उपचार करण्याचा निर्णय झाला. या शिबिराचे आयोजक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जयकर आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक वर्षा वाघमारे यांनी संबंधित विद्याथ्र्यांच्या पालकांना उपचारासंदर्भात मार्गदर्शन केले.
विद्याथ्र्यांचे आरोग्य सुरक्षित राखण्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाला सातत्याने यश येत आहे. पालकांची सकारात्मकता निश्चीतच या कार्यक्रमाला आकार देत आहे.-वर्षा वाघमारे, जिल्हा समन्वयिका, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, जळगाव