यावल तालुक्यातील चिखलीतील दत्त हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. एस. बोरसे यांनी कोरोना काळात शाळेतील शिक्षकांनी आठवड्यातून दोन दिवस उपस्थित राहण्याचे स्वलिखित पत्र काढले होते. तसेच स्वत: शाळेत अनुपस्थित राहून, शाळेतील शिक्षक हजेरीपत्रक बंद ठेवले होते. यामुळे कोरोना काळातही दररोज शाळेत कर्तव्यासाठी येणाऱ्या शिक्षकांना हजेरीची नोंद करता येत नव्हती. तसेच बोरसे यांनी स्वत:च्या अनुपस्थितीबाबत कुठल्याही वरिष्ठ शिक्षकांकडे तात्पुरता पदभार सोपविला नव्हता. तसेच शाळेतील शिक्षकांना यामुळे रजाही मंजूर करता येत नव्हती. या प्रकारामुळे शाळेतील शिक्षक एन. एस. बडगुजर, पी. बी. नारखेडे, के. व्ही. झांबरे, डी. पी. नेवे, एम. व्ही. ठाकूर, एस. एस. सपकाळे,आर. ओ. पाटील, संजय नेमाडे, आर. एल. काळे आदी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करून मुख्याध्यापक पी. एस. बोरसे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
शिक्षकांच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकांची चौकशी :
शाळेतील शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी उपशिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग यांना मुख्याध्यापक पी. एस. बोरसे यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार देवांग यांनी गेल्या महिन्यात २३ डिसेंबर रोजी बोरसे यांना नोटीस पाठवून ४ जानेवारी रोजी जळगावला सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ४ जानेवारी रोजी डॉ. डी. एम. देवांगडॉ. डी. एम. देवांग यांनी बोरसे शिक्षकांनी केलेल्या तक्रारीनुसार बराचवेळ चौकशी केली. त्यानंतर बोरसे यांनी तीन दिवसात या प्रकाराबाबत आपला जबाब देण्याचे आदेश दिले असल्याचे डॉ. डी. एम. देवांग यांनी `लोकमत`शी बोलताना सांगितले. बोरसे यांनी जबाब दिल्यानंतर सविस्तर चौकशी अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.