महापौरांकडून ठरावावर अखेर स्वाक्षरी : गाळेधारकांना स्वतः सिद्ध करावी लागेल पात्रता
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत झालेल्या महासभेत अंतर्गत गाळे ताब्यात घेऊन लिलाव प्रक्रिया मनपाकडून लवकरच हाती घेण्यात येऊ शकते, तसेच जे गाळेधारक अधिनियमातील बदलाप्रमाणे नूतनीकरणास पात्र ठरतील अशा गाळेधारकांना नोटीस देऊन पात्रता सिद्ध करण्याची संधी महापालिका प्रशासनाकडून दिली जाणार आहे.
१२ मे रोजी झालेल्या महासभेत मुदत संपलेले मार्केटमधील गाळे ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत मनपा प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला होता. या ठरावावर महापौर जयश्री महाजन यांनी स्वाक्षरी केली असून, आता पुढील कार्यवाहीसाठी मनपा प्रशासनावर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार मनपा प्रशासनानेदेखील थकीत भाडे असलेल्या गाळेधारकांच्या याद्या तयार करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार गाळेधारकांना लवकरच नोटिसा दिल्या जाण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे.
गाळेधारक घेणार आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट
एकीकडे मनपा प्रशासनाने ठरावानुसार पुढील कार्यवाही करण्याच्या हालचाली सुरू केल्या असताना, दुसरीकडे मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनीदेखील आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासाठी मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांची संघटनेचे पदाधिकारी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेणार आहेत, तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीदेखील शनिवारी गाळेधारक भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनपा प्रशासनाने गाळे ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केल्यास गाळेधारकांनीदेखील आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे मनपा प्रशासन गाळ्याबाबत कारवाई करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नूतनीकरणासाठी काय असेल पात्रता
१. गाळेधारकांना नूतनीकरण करण्यासाठी मनपा प्रशासनाच्या नवीन धोरणात काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यानुसार मनपा अधिनियमात सप्टेंबर २०१९ मध्ये केलेल्या बदलांतर्गत गाळेधारक पात्र व अपात्र ठरणार आहेत.
२. महानगरपालिकेच्या मालमत्तांचे हस्तांतरण वैधरीत्या झाले असावे.
३. संबंधित मालमत्तेबाबतचे सर्व कर, भाडेपट्टाधारकाने भरलेले असावे, भाडेपट्टाधारक आकडे भाडेपट्टीची कोणत्याही प्रकारच्या कराची रक्कम थकीत नसावी.
४. भाडेपट्टाधारकाने भाडेपट्टीसंदर्भात यापूर्वी करण्यात आलेल्या करारनाम्यातील अटी-शर्तींचा भंग केलेला नसावा.
५. भाडेपट्ट्याचे नूतनीकरण हे कमाल दहा वर्षांसाठी असेल.
६. भाडेपट्ट्याने देण्यात आलेली मिळकत ही हस्तांतरण व गहाण ठेवता येणार नाही. यासह अनेक अटी व शर्तींची पूर्तता गाळेधारकांना करावी लागणार आहे.
पात्र न झाल्यास लिलाव अटळ
गाळेधारकांना नूतनीकरण करण्यासंदर्भात मनपा प्रशासनाकडून नवीन नियमावली जाहीर केली जाणार आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये राज्य शासनाने ७९-क या कलमामध्ये केलेल्या बदलानुसार गाळेधारक नूतनीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. यासंदर्भातली नियमावली गाळेधारकांना दिल्यानंतर गाळेधारक या नियमावलीच्या पात्रतेत बसत आहेत की नाही, याबाबतचे पुरावे महापालिका प्रशासनाकडे सादर करावे लागणार आहेत. जे गाळेधारक या नियमावलीत बसतील. त्यांनाच नूतनीकरणाचा लाभ मिळू शकणार आहे. याबाबतची प्रक्रिया पंधरा दिवसांत राबविली जाणार आहे. मनपाच्या नियमावलीत जे गाळेधारक पात्र ठरणार नाहीत अशा गाळेधारकांच्या गाळ्यांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.