ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 28- महान गुरुमती समागम सोहळ्यानिमित्त रविवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान तलवारबाजी तसेच भाले व दांडपटय़ाच्या चित्तथरारक कसरती अशा विविध शस्त्रविद्येच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या ह्रदयाचा ठोका चुकविला. शीख समाजाचे धर्मगुरू श्री गुरुगोविंद सिंह यांची 351वी जयंती तसेच चार साहेबजादे, माता गुजर कौर आणि हिंद की चादर धनगुरू तेग बहादूर साहेब यांच्या शहिद दिवसानिमित्त दमदमी टकसाल आणि श्री गुरुनानक दरबार, तांबापुरा यांच्या संयुक्त विद्यमाने चौथा महान गुरुमती समागम सोहळा 27 व 28 जानेवारीदरम्यान मेहरूण परिसरातील विद्या इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात झाला. या सोहळ्याचा समारोप रविवारी नगर कीर्तनाने झाला. नगर कीर्तनप्रसंगी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पंजाब येथून आलेले गत्का पार्टी व धुळे येथील गुरुद्वारा साहेब रणजीत आखाडय़ातील गत्का जत्थेदार जगविंदर सिंह व त्यांच्या सहका:यांनी शस्त्रविद्येचे प्रदर्शन घडविले. 27 रोजी सायंकाळी विद्या इंग्लिश स्कूलच्या मैदानावर कीर्तन दरबार सत्संगाने या सोहळ्याला प्रारंभ झाला होता. त्यानंतर 28 रोजी सकाळी 10 वाजता पाठ साहेबांची समाप्ती झाली. त्यानंतर कीर्तन झाले. दुपारी 1 वाजता नगर कीर्तन भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. या धार्मिक कार्यक्रमांसाठी संत बाबा धीरज सिंह (धुळे), रागीभाई संतोष सिंह, रागीभाई सरवन सिंह, बाबा दशटन सिंह, रागीभाई गुरप्रित सिंह उपस्थित होते. हे संपूर्ण कार्यक्रम दमदमी टकसालचे प्रमुख संत बाबा राम सिंह खालसा मिंडरावाले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडले.नगरकीर्तन भव्य शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेला विद्या इंग्लिश स्कूलपासून प्रारंभ झाला.
सुरेशदादा जैन यांनी दिल्या शुभेच्छा या सोहळ्य़ास्थळी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी भेट देऊन शीख बांधवांना शुभेच्छा दिला. या वेळी माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक जितेंद्र मुंदडा, विजयकुमार वाणी, नरेश खंडेलवाल हेदेखील उपस्थित होते. या वेळी सुरेशदादा जैन यांच्यासह उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.
मुस्लीम बांधवांतर्फे स्वागतशोभायात्रा तांबापुरा परिसरात पोहचली त्या वेळी मुस्लीम बांधवांच्यावतीने संत बाबा ज्ञानी रामसिंग यांचा सत्कार करण्यात येऊन शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. सोहळ्य़ासाठी गुरुद्वारा गुरुनानक दरबार साहेब तांबापुराचे अध्यक्ष गुरुचरणसिंग, अनिलसिंह भट्टी, राजनदीप सिंग, वीरसिंह भट्टी, हरजितसिंह बावरी, रामसिंग बावरी, मानसिंग बावरी, संतोषसिंह टाक, ईश्वरसिंह टाक, जसवंतसिंग टाक, कमलसिंग बावरी, दिलीपसिंह बावरी, सतनामसिंह बावरी, बरकतसिंह बावरी, सोनू शर्मा, वीरसिंह भट्टी, श्याम पोथीवाल, सिमरनसिंग नोट, परदीपसिंग जोहरी, सुरेंदरसिंग जोहरी, शैलेंदरसिंग जोहरी आदींनी परिश्रम घेतले.