‘लु’ वा:यांमुळे उष्णतेचा कहर : सात वर्षाचा विक्रम मोडला
जळगाव,दि.29 - गेल्या आठवडय़ाभरापासुन जळगाव शहरात उष्णतेची लाट पसरली असून, मार्च महिन्यात पारा 42.8 अंशावर पोहचला आहे. तापमानाने गेल्या सात वर्षाचा विक्रम मोडला आहे. वाढत्या तापमानामुळे जळगाव शहरात दिवसभर अघोषीत संचारबंदी असल्याची स्थिती आहे. महाराष्ट्रात सध्या कोरडय़ा व उष्ण वा:यांचा म्हणजेच ‘लु’ वा:यांचा प्रकोप वाढला असल्याने उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
जळगाव शहराच्या तापमानाने 42 अंशाचा पारा गाठला आहे. मार्च महिन्यात जळगाव पा:याने 7 वर्षानंतर पहिल्यांदाच 40 अंशाचा पारा ओलांडला आहे. याआधी 2010 मध्ये जळगावचा पारा 41 अंशावर पोहचला होता. त्यानंतर पहिल्यांदाच शहराच्या तापमानाने मार्च महिन्यात 42.8 अंशाचा पारा गाठला आहे. तापमान वाढीमुळे सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणारे जळगाव शहर ‘हॉटसीटी’ म्हणून ओळखले जात आहे. तापमान वाढीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. सकाळी 11 वाजेनंतर शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणे उपनगरातील रस्ते देखील ओस पडत आहे. तसेच रात्री उशीरार्पयत उष्णतेचा झळा नागरिकांना बसत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे.
आठवडाभर राहणार कहर कायम
उत्तर भारत व राजस्थान कडून येत असलेल्या उष्ण वा:यांमुळे तापमानात वाढ होत असल्याची माहिती पुणे हवामान खात्याने दिली आहे. ‘लु’ वा:याचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने किमान आठवडाभर तरी जळगावकरांना उकाडय़ापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. यामुळे नागरिकांसोबतच पशुपक्ष्यांचे देखील हाल होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडुन भारनियमन सुरु करण्यात आले आहे. यामुळे उकाडय़ापासून त्रस्त असलेल्या नागरिकांच्या त्रासात वाढ होत आहे. दुपारी 3 तास भारनियमन होत असल्याने जबरदस्त उकाडय़ामुळे घरात राहणे देखील शक्य होत नाही. उन्हाचा प्रकोप वाढल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु करण्यात आला आहे.