जळगाव : शिवाजीनगरातील लाकूडपेठ भागात शनिवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याने हाहाकार उडाला. एक सॉमील व दोन प्लायवूडची दुकाने या आगीत भस्मसात झाली. अग्निशमन दल, जैन इरिगेशनचे बंब आणि रहिवाशांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तरीही रात्री २ वाजेपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगरात कानळदा रस्त्यावर शहरातील सर्वात मोठी लाकूडपेठ आहे. तिला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. शिवविजय सॉ मीलला सर्वप्रथम आग लागली. त्यानंतर नजीकच असलेल्या स्वस्तीक प्लायवूड व अंबाजी टिंबर अॅड प्लायला आग लागली, त्यात ते भस्मसात झाले.
आगीचे वृत्त कळताच नागरिकांनी मनपाच्या अग्निशमन दलाला कळविले. तोपर्यंत घरातील पाणी बादल्यांद्वारे आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पाच बंब रिकामे झाले तरी आग आटोक्यात येत नव्हती. आगीचे वृत्त समजताच शिवाजीनगरात प्रचंड धावपळ उडाली.
नागरिकांनी सॉमीलच्या मालकांना या घटनेबाबत कळविल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी पोहचले. भीषण आग पाहून त्यांना धक्का बसला. आगीचे प्रचंड लोळ आकाशात झेपावत होते.
शिवाजीनगर पुलावरील क्रॉसबारमुळे बंबांना विलंबशिवाजीनगरातील उड्डाणपूल जीर्ण झाल्याने त्यावर क्रॉसबार लावण्यात आलेला आहे, त्यामुळे अग्निशमन दलाच्या बंबांना सुरत रेल्वे गेटमार्गे यावे लागत असल्याने त्यांना विलंब होत होता. रात्री १.३० वाजेपर्यंत ५ बंब रिकामे झाले होते, त्यानंतरही आग धुमसतच होती.
नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळलाशिवाजीनगरातील रहिवाशांना आग लागल्याचे कळताच त्यांनी आरडाओरड केल्याने तसेच अग्निशमन दलाला घटनेबाबत माहिती कळविली. त्यामुळे तत्काळ अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. आणखी थोडा विलंब झाला असता तर आगीने आणखी उग्र रुप धारण केले असते.