जळगाव - जळगाव जिल्ह्य तथा परिसरात सोमवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या ३० दिवसांत चाळीसगावमधील डोंगरी आणि तितूरला पाचव्यांदा पूर आला आहे. पुराचे पाणी बाजारात शिरले आहे. याशिवाय अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. (Heavy rain in Chalisgaon area; Fifth flood in 30 days)
या पुरामुळे नव्या आणि जुन्या गावचा संर्पक तुटला आहे. तर दुसरीकडे देवळी गावाजवळ चाळीसगाव-मालेगाव रस्त्याचे काम सुरु असल्याने कडेला असलेला भराव मंगळवारी झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे.
जामनेर तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर नदीलाही मोठा पूर आला आहे. वाकोद, पहूर व नेरी गावातून वाहणारी वाघूर नदीही खळाळली आहे. उगम क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जामनेरमधून वाहणाऱ्या कांग नदीलाही पूर आला आहे.
घुसर्डी गावात घुसलं पुराचं पाणी -सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे पाचोरा शहराच्या अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर भडगाव तालुक्यातील घुसर्डी गावात पुराचे पाणी घुसले आहे. धुवांधार पावसामुळे भोरटेक येथील बबन धनगर यांचे घर कोसळले असून सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही.मराठवाड्यातही जोरदार पाऊस - मराठावाड्यातही सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला आणि नांदेड जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत.
कजगावला पुराच्या पाण्याचा वेढा. नगरदेवळा येथे बाजारपेठ पाण्यात -भडगाव तालुक्यातील कजगावला सोमवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. नगरदेवळा ता. पाचोरा येथील अग्नावती नदीला महापूर आला आहे. संपूर्ण बाजारपेठ पाण्यात गेली आहे. यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. येथील महादेव मंदिरातही ३ ते ४ फूट पाणी शिरले आहे. तोंडापूर ता. जामनेर येथे पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या गावाचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे.