महापौर, उपमहापौरांनी घेतला समतानगरातील स्वच्छतेचा आढावा
जळगाव : शहरातील समतानगर परिसराला बुधवारी दुपारी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट दिली. तेथील गटारींच्या स्वच्छतेसह घंटागाडी, सहा सार्वजनिक शौचालये, अमृत योजनेंतर्गत झालेली कामे यांची गल्लीबोळांत जाऊन पाहणी केली. माता रमाई आंबेडकर जलकुंभाजवळील छत्रपती चौकापासून पाहणी दौरा सुरू करून हनुमान मंदिर, साई मंदिरासह त्याच्या पाठीमागील विहिरीनजीकचा परिसर, बजरंग चौक, आंबेडकर पुतळा आदी ठिकाणी भेट दिली.
मनपा मालमत्ता कराची ४ कोटींची वसुली
जळगाव : मनपा मालमत्ता करात १० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या महिनाभरात ४ काेटी ८५ लाख रुपयांचा ऑनलाइन भरणा झाला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ऑनलाइन पद्धतीने एवढ्या माेठ्या प्रमाणात करदात्यांनी घरबसल्या कराचा भरणा केला आहे. याशिवाय प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात धनादेश टाकण्यासाठी बाॅक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाकडून दरवर्षी एप्रिल महिन्यात १० टक्के सूट दिली जाते. परंतु यंदा काेराेनाच्या पार्श्वभूमीवर २१ एप्रिलपासून ऑनलाइन भरणा स्वीकारण्यास सुरुवात झाली. ३१ पर्यंतच सूट दिली जाणार असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली.