आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.६ : दिवसभराच्या उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना मंगळवारी सायंकाळी वादळी वारा व ढगांचा गडगडाट अन् विजांच्या चमचमाटासह जोरदार पाऊस झाल्याने दिलासा मिळाला. सुमारे अर्धातास पाऊस झाला.पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला. दोन तासानंतर काही भागात वीज पुरवठा सुरळीत झाला. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे दुपारी बारापर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नाही. ढगाळ वातावरण असतानादेखील, वाऱ्याचा वेग मंद असल्यामुळे सकाळपासून तीव्र उकाडा जाणवत होता. दुपारनंतर मात्र सूर्यदर्शंन झाल्याने, उकाडा अधिकच वाढला. सहानंतर मात्र जोराने वारे वाहत होते. साडेसात वाजता पावसाला सुरुवात झाली. दापोरा, शिरसोली येथेही पाऊस झाला.नागरिकांचे हाल... सायंकाळी साडेसातला पावसाला सुरुवात झाल्यानंतर लगेच शहरातील सर्व भागातला वीज पुरवठा खंडीत झाला. पाऊस थांबतल्यानंतरही वीज पुरवठा लगेच सुरु न होता, अर्ध्यातासाने सुरु झाला. तब्बल दोन तास वीज पुरवठा खंडीत असल्यामुळे रस्त्यावर अंधार पसरलेला होता.
ढगांचा गडगडाट आणि वारा मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे वीज पुरवठा उशीरा सुरु करण्यात आला.तसेच आपत्कालीन परिस्थिती संदर्भात कंट्रोल रुमचा फोन कुणी उचलत नसेल, तर याची चौकशी करण्यात येईल. -संजय तडवी, कार्यकारी अभियंता, महावितरण.