जळगाव : गेल्या २४ तासात तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर २३ मंडळात ‘दम’धारा बरसल्या असून सर्वाधिक पावसाची नोंद तोंडापूर (जामनेर) येथे झाली आहे. १०३ मि.मी.इतका पाऊस या मंडळात झाला आहे.शुक्रवारी रात्री जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे धरणांसह नदीनाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे. तसेच पिकांना तारणाऱ्या या पावसामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी होणार आहे.तीन तालुक्यात ‘धो-धो’गेल्या २४ तासात सर्वाधिक पाऊस जामनेर तालुक्यात झाला. जामनेर तालुक्यात ८०.०१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पाचोऱ्यात ६९.६ तर भडगावला ६७.९ मि.मी. इतक्या पावसाची नोंद घेण्यात आली आहे.गिरणा वाहू लागलीयंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच गिरणा नदीतून पाणी वाहून निघत आहे. दापोरा बंधाराही पूर्णत: भरला असून गिरणेतील पाण्याच्या प्रवाहात आणखी वाढ होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.या मंडळात अतिवृष्टीजिल्ह्यातील २३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यात कुऱ्हे (भुसावळ), साकळी (यावल), खानापूर (रावेर), रिंगणगाव (एरंडोल), शेळावे (पारोळा), बहादरपूर (पारोळा), जामनेर, नेरी, नाकडी, फत्तेपूर,शेंदुर्णी, पहूर, तोंडापूर (जामनेर), नांद्रा, नगरदेवळा, कुऱ्हाड, वरखेडी, पिंपळगाव (पाचोरा), भडगाव, कजगाव, आमडदे, कोळगाव (भडगाव) या मंडळांचा समावेश आहे.
जामनेर, पाचोरा, भडगावमध्ये अतिवृष्टी! २३ मंडळात ‘धो-धो’; तोंडापूरमध्ये १०३ मि.मी.वर पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 7:17 PM