जळगाव : महाराष्टÑाच्या पश्चिम किनारपट्टी लगत कमी दाबाची एक ट्रफ रेषा तयार झाल्यामुळे सोमवारी शहरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. ४ वाजेला सुरु झालेल्या पावसाची रिपरिप सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत सुरु होती. यामुळे शहराच्या जनजीवनावर किरकोळ परिणाम झालेला पहायला मिळाला.हवामान विभागाकडून जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानूसार दुपारी १ वाजेपासून शहरात ढगाळ वातावरण पहायला मिळाले. त्यानंतर दुपारी ४ वाजेला रिमझीम पावसाला सुरुवात झाली. तसेच काही काळ पावसाचा जोर देखील वाढला, अचानक झालेल्या पावसामुुळे शहरातील मुख्य बाजारपेठ भागात व्यवसायीकांची धावपळ देखील उडाली होती. दरम्यान, अजून दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात देखील पावसाने हजेरी लावल्याने शेतीला देखील फायदा होणार आहे.किमान तापमानातही वाढगेल्या आठवड्याभरापासून शहरातील किमान तापमानात घट झाली होती. मात्र, सोमवारी ढगाळ वातावरणामुळे रविवारी १६ अंश असलेला किमान तापमानाचा पारा सोमवारी २२ पर्यंत गेला. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले होते. दोन दिवस शहरात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.