लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील प्रमुख नाल्यांसह ६७ नाल्यांची सफाई ७ जूनपर्यंत करण्याचा मनपा आयुक्तांनी सूचना देवूनही अद्यापर्यंत नालेसफाई पुर्ण होवू शकलेली नाही. ५ मुख्य नाल्यांची सफाई सुरुच असून, शहरात जोरदार पाऊस झाल्यास महापालिकेच्या नालेसफाईचे पितळ उघडे पडू शकते. महापालिका प्रशासनाने यंदाही नालेसफाईला उशीर केला आहे. पावसाळा सुरू झाल्यावर देखील शहरातील नालेसफाईचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे शहरात जोरदार पाऊस झाल्यास नाल्या काठच्या घरांमध्ये पुराचे पाणी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे
शहरात २३ किमी लांबीचे ५ मोठे नाले आहेत. या पाच प्रमुख नाल्यांसह ६७ उपनाले आहेत. सफाईची मोहीम पावसाळ्यापूर्वी केली जाते. या नाल्यामधील सर्व गाळ व कचरा काढून नाल्याचा प्रवाह मोकळा करण्याचे काम पावसाळ्यापूर्वी दोन महिने आधीपासून करण्यात येत असते. मात्र यावर्षी महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य नाल्याच्या साफसफाईला मोठा उशीर केला आहे. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर देखील शहरातील नाले सफाई अद्यापही पूर्ण झालेले नाही. शहरातून जाणा-या मुख्य लेंडी नाल्यात अनेक ठिकाणी कच-याचे ढिग साचले आहेत. तसेच अनेक ठिकाणी गाळ देखील साचला आहे. नाल्यालगत वाढलेली झाडे-झुडपे देखील अद्यापर्यंत काढण्यात आलेली नाहीत. तसेच नाल्यांचा सफाईच्या ठिकाणी साफसफाई करताना मनपाकडून गाळ व कचरा नाल्याच्या काठावरच टाकण्यात येत आहे़ त्यामुळे पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यास तो गाळ व कचरा पुन्हा नाल्यात जाऊन पुन्हा घाण साचणार आहे.
अग्निशमन विभाग सज्ज
पावसाळ्याच्या तोंडावर महापालिका प्रशासनाकडून आपत्कालीन कक्ष स्थापन केला जात असतो. मनपाच्या अग्निशमन विभागाकडे हा कक्ष तयार करण्यात आला आहे. यामध्ये आरोग्य व इतर विभागातील कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाकडून पावसाळ्यातील तीनही महिन्यांपर्यंत टोल फ्री क्रमांक देखील निश्चित केला जाणार आहे. जोरदार पावसात काही जीवित व वित्त हानी झाल्यास किंवा काही ही दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी महापालिका आपत्कालीन कक्षाला सूचना देऊन समस्येवर उपाययोजना करते शक्य होणार आहे. अग्निशमन विभागातील १६ कर्मचाऱ्यांसह इतर विभागातील कर्मचाऱ्यांना देखील ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शहरात १०८ धोकेदायक इमारती
पावसाळ्याच्या तोंडावर मनपा प्रशासनाकडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जात असते. यावर्षी देखील मे महिन्यातच प्रभाग समिती निहाय धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते. त्यानुसार शहरात १०८ धोकेदायक इमारती असून महापालिका प्रशासनाने संबंधित इमारत मालकांना नोटीस बजावल्या आहेत. या नोटीस बजावल्यानंतर अनेक इमारत मालकांनी इमारतींची तात्पुरती दुरुस्ती करून घेतली आहे. मात्र निम्म्यापेक्षा अधिक इमारत मालकांनी इमारतींची कोणतीही दुरुस्ती केलेले नाही. ज्यामुळे जोरदार पाऊस झाल्यास धोकादायक इमारत कोसळून त्यामध्ये जीवित हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासह मनपा प्रशासन व महावितरणकडून शहरातील धोकेदायक वृक्ष देखील छाटण्यात येत आहेत.
नाल्याच्या काठावरील अतिक्रमणकडे दुर्लक्ष
शहरातील मुख्य पाच नाल्यालगत असलेल्या अतिक्रमणाबाबत मनपा प्रशासन अजूनही उदासीन असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्रत्येक वर्षी महापालिका प्रशासनाकडून नाल्या लगतचे अतिक्रमण काढण्याबाबत सूचना दिल्या जातात. मात्र यावर प्रशासनाकडून कोणतीही अंमलबजावणी केली जात नाही. या वर्षी देखील महापालिकेने केवळ नोटीसांचा सोपस्कार पार पाडला असून कोणतीही कार्यवाही मनपाकडून याबाबत करण्यात आलेली नाही. यामुळे गोपाळपुरा, शनिपेठ या भागातील घरांमध्ये नाल्याचे पाणी जाण्याची ही भीती व्यक्त केली जात आहे.
कोट..
महापालिकेचा अग्निशमन विभाग पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. महापालिकेकडे यंत्रणा देखील पूर्ण असून, इतर विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे शहरात पावसा दरम्यान मदत कार्य पोहोचविण्यास कोणताही उशीर केला जाणार नाही.
-शशिकांत बारी, विभाग प्रमुख, अग्निशमन विभाग
मुदत संपूनही नालेसफाई सुरुच : नाल्या काठचे अतिक्रमण कायम
शहरातील प्रमुख नाले - ५
नाल्यालगत असलेल्या कॉलनी - १६८
पुरामुळे बाधित होऊ शकणाऱ्या कॉलनी - १९
फायर फाइटर - ५
रेस्क्यू व्हॅन - ००
फायबर बोटी - २
लाईफ जॅकेट -५०
कटर - १०