लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्याच्या अनेक भागात सोमवारी सायंकाळीही वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
अमळनेर तालुक्यातील डांगर येथे सलग दुसऱ्या दिवशीही वादळी पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्याने डांगर येथे बांधलेला बंधारा ओसंडून वाहू लागला आहे.
निपाणे ता. एरंडोल परिसरात सोमवारी संध्याकाळी ४० मिनिटे वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. यामुळे धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आनंदाचे वातावरण पसरले आहे. कासोदा ता.एरंडोल परिसरातही १५-२० मिनिटे दमदार पाऊस झाला. उंबरखेड ता. चाळीसगाव येथे सोमवारी सायंकाळी अर्धा तास पाऊस झाला.
पावसामुळे कपाशी लागवडीला वेग येणार आहे. पिंपळगाव हरेश्वर परिसरात मान्सूनपूर्व पाऊस रोहिणी नक्षत्राच्या सरी बरसल्या. यामुळे शेती कामांना वेग आलेला आहे. दहीगाव संत ता. पाचोरा येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे विजचे खांब, मोठी झाडे उन्मळून पडली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.