जळगाव : गुलाबी थंडी जाणवू लागताच भरीताच्या वांग्यांनाही मागणी वाढू लागली असून तयार भरीताची विक्री वाढली आहे. जळगावातून दररोज सुमारे ३० टन भरीताच्या वांग्यांची विक्री होत असून जिल्ह्यासह राज्यभरात येथून वांगे तसेच तयार भरीत पाठविले जात आहे. इतकेच नव्हे येथील प्रसिद्ध वांगे अमेरिकेसह इतर देशातही नातेवाईकांकडे पाठविण्यात येत आहेत. विदेशातही चवदरवळणाऱ्या या भरीताच्या वांग्याच्या आवकवर मात्र यंदा अतिवृष्टीचा परिणाम जाणवत आहे. वांग्याची आवककमी असल्याने डिसेंबर महिना उजाडला तरी त्यांचे भाव अद्यापही चढेच आहेत. दरवर्षी डिसेंबर महिन्यात २० ते ३० रुपये प्रती किलोने विक्री होणारे वांगे यंदा ४० ते ५० रुपये प्रति किलोने विक्री होत आहेत.जळगाव जिल्ह्यातील केळीसह भरीताचे वांगेही मोठे प्रसिद्ध आहेत. त्यात हिवाळ््यामध्ये जास्त मागणी असते ती भरीताच्या वांग्यांना. जळगाव जिल्ह्यातील वातावरण व येथील जमीन या वांग्यांसाठी पोषक असल्याने त्यांची जी विशिष्ट चव आहे, ती इतरत्र कोठेही मिळत नाही. त्यामुळे या वांग्यांना जास्त मागणी असते व ते येथेच मोठ्या प्रमाणात पिकविले जातात.गेल्या काही वर्षापासून पावसाळ््यामध्येच भरीताचे वांगे बाजारात येऊ लागले आहेत. मात्र त्यांची खास चव लागते ती हिवाळ््यामध्ये. त्यामुळे थंडी वाढू लागली की या वांग्यांचीही मागणी वाढते.यंदा आवक कमीजळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातील बामणोद, भालोद, पाडळसे, जळगाव तालुक्यातील असोदा, भादली तसेच वरणगाव, बोदवड व रावेर तालुक्यांमध्ये भरीताच्या वांग्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरवर्षी दसºयापासून या वांग्यांची आवक वाढण्यास सुरुवात होते. मात्र यंदा आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने या वांग्याच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जून-जुलै महिन्यात लागवड झालेल्या वांग्याच्या पिकावर अतिपावसाचा परिणाम होऊन झाडांना फळ धारणा झालीच नाही. त्यामुळे यंदा पाहिजे त्या प्रमाणात या वांग्यांची आवक दसरा असो की दिवाळीमध्ये वाढली नाही. तसे बाजारात कधीपासूनच वांगे उपलब्ध आहेत, मात्र हिवाळ््याच्या हंगामात येणारे वांगे वेळेवर बाजारात आले नाही. या झाडांना आता चांगला बहार येत असल्याचे वांगे उत्पादकांनी सांगितले. सध्या बाजारात मे महिन्यात लागवड केलेल्या पूर्वहंगामी लागवडीच्या वांग्यांचा आधार आहे. त्यामुळे बाजारत जवळपास ३० टन वांग्याची विक्री होत आहे. मात्र यंदा हे वांगे वाढीव भावाने खरेदी करावे लागत असल्याचे चित्र आहे.भरीत केंद्रांवर अधिक मागणीघरगुती भरीत करण्यासाठी तसेच हॉटेल चालकांकडून या वाग्यांची खरेदी होते. त्यात आता काही वर्षांपासून खास भरीत सेंटरही सुरू झाल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वांग्यांना मागणी असते. जळगाव शहरात २०च्यावर भरीत सेंटर असून त्यातील तीन ते चार सेंटरवर नेहमी वर्दळ असते. त्यामुळे या भरीत सेंटरवरच जास्त वांग्यांना मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या घरी भरीत करण्यासह तयार भरीताला पसंती दिली जात असल्याने त्याची विक्री वाढली आहे.भरीत पार्ट्यांचे आयोजनजळगाव जिल्ह्यात हिवाळ्यात भरीत पार्ट्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. त्यास आता हळूहळू सुरुवात होणार आहे. या सोबतच लग्न असो अथवा कोणताही समारंभ तेथे जेवणामध्ये इतर पदार्थांसह भरीताचा मेनू हमखास असतोच.तजेलदार वांग्यांना मागणीवांगे भाजल्यानंतर त्यामधून जास्त तेल सुटेल अशा वांग्यांना अधिक मागणी असते. यासाठी जळगाव जिल्ह्यातील बामणोद, असोदा, भादली या भागातील वांगे अधिक प्रसिद्ध आहे. असोदा येथे तर पिढ्यां-पिढ्यांपासून भरीताच्या वांग्यांची शेती केली जात आहे.भरीताची विदेशवारीजळगाव जिल्ह्यातील अनेक मंडळी अमेरिका तसेच इतर देशांमध्ये वास्तव्यास आहे. ही मंडळी हिवाळ््यामध्ये येथे आली अथवा येथील नातेवाईक त्यांच्याकडे गेले तर सोबत हमखास वांगे अथवा भरीत घेऊन जात असतात. या सोबतच दररोज जळगावातून पुणे, मुंबईला स्थायिक झालेल्या नातेवाईकांकडे ट्रॅव्हल्सद्वारे वांगे पाठविले जातात.अति पावसामुळे भाव तेजीतयंदा आॅक्टोबर महिन्यात अति पाऊस झाल्याने त्यामुळे उत्पादनावर काहीसा परिणाम झाला आहे. त्यामुळे भाव वाढून ते ४० ते ५० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. एरव्ही दरवर्षी या दिवसात हे भाव २० ते ३० रुपये असतात.तयार भरीतही महागलेभरीत सेंटरवर तयार भरीताला मोठी मागणी असून येथून पार्सल नेणाऱ्यांची संख्या मोठी असते. एरव्ही १४० रुपये प्रती किलो असलेल्या भरीताचे भावदेखील वाढले आहेत. सध्या वांग्याचे भाव वाढल्यामुळे तयार भरीताच्या भावात प्रती किलो २० रुपयांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी शहरातील काही भरीत सेंटरने ग्राहकी टिकविण्यासाठी आहे त्याच भावात विक्री सुरू ठेवली आहे.जळगाव जिल्ह्यातील पूरक वातावरणामुळे येथील वांग्यांना विशिष्ट चव असते. या दिवसात त्यांना मागणी वाढते. यंदा ही मागणी कायम असली तरी अतिवृष्टीमुळे वांग्याच्या उत्पादनावर परिणाम होऊन आवक कमी झाली आहे.- किशोर चौधरी, वांगे उत्पादक, असोदासध्या भरीताच्या वांग्यांची मागणी वाढली असून यंदा अवकाळी पावसामुळे भाव वाढले आहे.- कैलास महाजन, भाजीपाला विक्रेते.
अतिवृष्टीचा फटका : आवक घटल्याने यंदा भरीताच्या वांग्याचे भाव चढेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 11:47 AM