अमळनेर : जुलै महिन्यात येरे येरे पावसा ... म्हणत प्रार्थना केल्याने वरुणराजा इतका बरसला आहे की आता त्या गाण्यात बदल करून जारे जारे पावसा...तुला देतो पैसा असे म्हणण्याची वेळ आली असून पाणीच जिरत नसल्याने आता घरांना पाण्याचा वेढा पडला आहे तर विहिरी ओसंडून वाहू लागल्या आहेत. नागरिकांचे दैनंदिन जीवनमान विस्कळीत झाले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने संततधार लावल्याने विद्यानगर, क्रांती नगर, एलआयसी कॉलनी, विठ्ठल नगर, उत्कर्ष नगर, संत सखाराम महाराज नगर, टेलिफोन कॉलनी, सम्राट हॉटेल आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
पाणी जमिनीत जिरत नसल्याने घरांच्या आजूबाजूला पाणी होऊन मोठमोठे डबके झाले आहे. तर काही घरात पाणी शिरले आहे. या भागातील विहिरींची पाणी पातळी जमिनीला समांतर आली असून विहिरींचे पाणी जमिनीवर ओसंडून वाहत आहे. कठडे बांधले असल्याने ती विहीर असल्याचे समजते अन्यथा विहीर आणि डबके समान झाले असते. घरी येण्यासाठी अथवा बाहेर जाण्यासाठी गुडघाभर पाण्यातून वाहने न्यावी लागतात. अनेक वाहनांच्या सायलेन्सरमध्ये पाणी घुसून वाहने बंद पडली आहेत. भुयारी गटारींमुळे खोदलेल्या चाऱ्यामुळे खड्डे पडले असून पाण्याच्या डबक्यात खड्डे दिसत नसल्याने पाय फसत आहेत तर मोटरसायकल व सायकलीचे अपघात होत आहेत.
पाण्याचा निचरा होत नाही
अनेक वर्षांपासून या भागात गटारी बांधलेल्या नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. कर भरून देखील नागरिकांना सुविधा मिळत नाही. काही नागरिकांनी तर डबक्यांचे पाणी, आणि रस्त्यावरील पाणी भुयारी गटारीत सोडले आहे. त्यामुळे काही ठिकाणी भुयारी गटारींचे चेम्बरमधून पाणी वाहत आहे.
त्याचप्रमाणे संत प्रसाद महाराज नगर, संताजी नगर भागात देखील पिंपऱ्या नाल्याला अरुंद केल्याने गल्ल्यांमधून पाणी वाहत आहे. याकडे देखील नगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे.
फोटो