बिडगाव, ता.चोपडा : परिसरात गेल्या २० ते २५ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बहुतांश पिके वाया जाण्याच्या मार्गावर असून कांद्याच्या पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अती पावसाने लागवड केलेला कांदा खराब झाल्याने त्याच्यावर वखर फिरवून नष्ट करण्याची दुर्दैवी वेळ आल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत.बिडगावसह परिसरातील धानोरा, देवगाव, पारगाव, पंचक, लोणी, मोहरद, वरगव्हान,खर्डी, लोणी, मितावली, पुणगाव आदी गावांना २०१३ नंतर म्हणजे तब्बल सहा वर्षांपासुन समाधानकारक पाऊस होत नव्हता. मात्र यावर्षी चांगला पाऊस झाला. चिंचपाणी धरणही भरले. सर्वच नदी-नाले वाहत आहेत. मात्र गेल्या २० ते २५ दिवसांपासुन परिसरात सुरू असलेल्या रिपरिप पावसाने पिकांवर करपा, मर, बुरशी अशा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. उत्तम स्थितीत असलेल्या कापसावर बुरशीमुळे फुलपात्यांची गळ झाली आहे. मका पीक तर लष्करी अळीने पूर्णपणे नष्ट केले आहे.झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.