एरंडोल : सोमवारी उत्राण व कासोदा महसूल मंडळामध्ये सोमवारी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे. तसेच नाले व ओढे यांना पूर आला असून, मंगळवारी ते प्रवाहित झाले आहेत.
एरंडोल व रिंगणगाव या मंडळांमध्येसुद्धा पावसाने मध्यम स्वरूपात हजेरी लावली आहे. पावसाचे तालुक्यात पुनरागमन झाल्यामुळे खरीप पेरण्या कामाला वेग आहे. बऱ्याच दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. दरम्यान, अतिवृष्टीमुळे कुठेही प्राणहानी झाली नसल्याची माहिती एरंडोल तहसील कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
उत्राण मंडळात पावसाने शतक गाठले आहे. या ठिकाणी १०५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे तर कासोदा मंडळात ६८ मिलिमीटर जलधारा बरसल्याची नोंद आहे. या दोन्ही मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे पाणीच पाणी चोहीकडे असे चित्र दिसत आहे.
एरंडोल मंडळात १८ मिलिमीटर व रिंगणगाव मंडळात ११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. एकंदरीत पावसामुळे तालुक्यात सर्वत्र खरीप पेरण्या वेगाने सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत तालुक्यात ११४.७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.