बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक तालुक्यांमध्ये तुफान पाऊस होत असून, सोमवारी भडगाव, चाळीसगाव तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. सलग दोन दिवस या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे कृषी विभागाने तातडीने या भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यासह पाचोरा, एरंडोल व धरणगाव तालुक्यात देखील सोमवारी रात्री व दिवसा देखील जोरदार पाऊस झाला आहे.
सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होत असतो. यावर्षी मान्सून लवकर परतीच्या मार्गाला लागेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. मात्र, बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचे क्षेत्र विकसीत होत असल्याने मान्सूनचा मुक्काम देखील वाढवला आहे. सोमवारी जिल्ह्यातील गिरणा काठलगतच्या जवळजवळ सर्वच सहा तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे कापूस, सोयाबीन पीकाचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी कापूस वेचणीवर आला असतानाच सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसाने गाठली शंभरीजिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान एकूण सरासरीच्या ९८ टक्के इतका पाऊस होत असतो. जिल्ह्यात एकूण पावसाची सरासरी ६३२ मिमी इतकी असते. मात्र, २० सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ६३४ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
बहाळ, पिंपळगाव महसुल मंडळामध्ये अतिमुसळधार पाऊसचाळीसगाव तालुक्यातील बहाळ महसुल मंडळात एकाच दिवसात तब्बल १४३ मिमी पाऊस झाला आहे. तर पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव या महसुल मंडळात १०७ मिमी पाऊस झाला आहे. दोन्ही महसुल मंडळांमध्ये एकाच दिवसात १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यासह चाळीसगाव मंडळात ८३, शिरसगाव ६७, मेहुणबारे ७५, हातले ८३, तळेगाव ६७, खडकी ७० अशा सर्वच महसुल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर भडगाव तालुक्यातील कजगाव महसुल मंडळात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी झाली असून, या मंडळात ९४ मिमी पाऊस झाला.
जिल्ह्यात यलो अलर्टबंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यात २३ पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसासोबतच वीजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी दरम्यान राहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कमी दाबाचे क्षेत्र ज्या प्रकारे मध्यप्रदेश व विदर्भाच्या दिशेने सरकेल त्याच प्रमाणे जिल्ह्यात पावसाचाही वेग वाढण्याचा अंदाज आहे.