सुशील देवकर / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १८ - साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि अतिशय शुभ मानल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत घागर, फळे, पूजा तसेच विविध आवश्यक वस्तू आणि किराणा मालाच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली होती.अक्षयतृतीया तोंडावर आल्याची चाहूल तशी गेल्या ३-४ दिवसांपासूनच बाजारपेठेत वाढलेल्या वर्दळीने जाणवत होती. मात्र मंगळवारी दुपारनंतर बाजारातील गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली. आखाजीसाठी माहेरी आलेल्या लेकींसाठी खरेदी करणाºयांचेही प्रमाण मोठे असल्याने लाखोंची उलाढाल झाली आणि व्यवसायांमध्ये चैतन्य आले.घागरींना मागणीघागर बाजारात मोठी गजबज होती. गेरू रंगातील लहान मोठ्या आकाराच्या व आकर्षक घागरीचे भाव विचारणाºया महिला, पुरूष व त्यांच्याकडून होणारी घासाघीस ऐकण्यासारखी ठरत होती. विक्रेते काडीने घागर ‘टकटक’ वाजवून तिच्या पक्केपणाची खात्री करून देत होते. लहान घागर ४० रूपये तर मोठी घागर ५० - ६० रूपयांना विक्री होत होती. आंब्याचा खरा सिझन अक्षयतृतीयेपासूनच सुरू होतो. १०० ते १४० रूपये किलोने आंब्यांची विक्री होत होती. अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून वाहन टीव्ही, मोबाईल तसेच सोने खरेदी, नवीन व्यवसायाचा शुभारंभ यासाठीही अनेकांची धावपळ सुरू होती.वाहतुकीची कोंडी४३ अंशाचा पारा गाठलेले कडक ऊन व हवेतला उष्मा यांना न जुमानता शहरी व ग्रामीण भागातील स्त्री-पुरूषांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. टॉवर चौक, फुले मार्केट, साने गुरूजी चौक, घाणेकर चौक, सुभाष चौक, बळिराम पेठ येथे मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे गर्दी उसळली होती. त्यात वाहनांच्या कर्कश हॉर्नची भर पाडत होती. वाहनधारकांपेक्षा पायी चालणाºयांना मार्ग काढणे सोयीचे होत होते, एवढी बाजारात गर्दी होती. याखेरीज रामानंदनगर, पिंप्राळा आदी उपनगरांमध्येही बाजार भरलेला होता. या दिवशी घरोघरी पितरांचे श्राद्ध केले जाते. त्यांना वर्षभर पाणी प्यायला मिळावे म्हणून घागर भरली जाते, पितरांसाठी पान वाढले जाते.त्यासाठी पुरणाची पोळी, आंब्याचा रस,भजी यासह नेहमीचा स्वयंपाक केला जातो.
अक्षयतृतीयेच्या खरेदीसाठी जळगाव बाजारपेठेत प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:19 PM
घागर, आंबे व डांगरला मोठी मागणी
ठळक मुद्देलाखोंची उलाढालवाहतुकीची कोंडी