जळगाव: भूसंपादनाचा केवळ भाडेपट्टा व काही रक्कम मोबदला म्हणून दिला असताना ५० टक्के आगाऊ मोबदला देण्यासाठीही प्रशासनाकडून फिरवाफिरव सुरू आहे. लघुपाटबंधारे विभागाने नियम डावलून भाडेपट्टा कपात करून आगाऊ मोबदल्याची रक्कम वाटपासाठी प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठविल्याची तक्रार करीत भोंडण येथील चौघा शेतकºयांनी मंगळवारी लघुपाटबंधारे विभागात ठिय्या मांडला. सोबत रॉकेलचा डब्बा तसेच फाशी घेण्यासाठी दोर घेऊन आलेल्या या शेतकºयांनी मोबदला घेतल्याशिवाय हलणार नसल्याचा पवित्रा घेतला.नदीजोड प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता डीपीडीसीकडून दिली जाते. मात्र हे काम लघुपाटबंधारे विभागामार्फत केले जाते. त्यातील जामदा डावा कालवा तलाव पाटचारीसाठी भूसंपादन प्रस्ताव क्र.४१/२०१५ नुसार पारोळा तालुक्यातील भोंडण, पोपटनगर, व शिरसमणी येथील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी उपविभागीय अधिकारी एरंडोल यांनी कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग जळगाव यांना भूसंपादन कायद्यातील जुन्या तरतुदीनुसार दोन तृतीयांश रक्कमेची मागणी करण्यात आली होती. मात्र शेतकºयांनी शासनाच्या ३०मार्च २०१६ च्या निर्णयाचा आधार घेत भूसंपादन प्रक्रियेस लागणारा विलंब लक्षात घेऊन शेतकºयांना (भूधारकांना ) मोबदल्याच्या ५० टक्के रक्कम आगाऊ देण्याची मागणी केली. त्यानुसार उपविभागीय अधिकाºयांनी भूसंपादनाच्या संयुक्त मोजणीचे क्षेत्र १९ हेक्टर २२ आर साठी ५० टक्के रक्कम २.५लाख प्रती हेक्टर या मनमानी भावाने १ कोटी ३२ लाख ५३ हजार ७७५ रूपये शेतकºयांना वाटपासाठी उपविभागीय कार्यालय एरंडोल यांच्याकडे जमा करण्याची मागणी केली होती. लघु पाटबंधारे विभागाने डीपीडीसीकडे पूर्ण १०० टक्के रक्कमेची म्हणजे २ कोटी ६५ लाखांची मागणी केली. त्यासोबतच इतर ६ योजनांसाठीही निधीची गरज असल्याने एकूण ५ कोटी २३ लाखांची मागणी केली. मात्र डीपीडीसीने केवळ २ कोटी ३१ लाख रूपये दिले. हा निधी ७ योजनांसाठी वाटप करण्यात आला. त्यासाठी देखील शेतकºयांना आंदोलन करावे लागले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी हे उपोषण सोडवले होते. तसेच आमदार डॉ.सतीश पाटील यांनीही लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. त्यापूर्वी ४४ लाखांचा अॅडव्हान्स या शेतकºयांना भाडेपट्टा म्हणून देण्यात आलेला होता.नियम डावलून भाडेपट्टा कपातशासन निर्णयानुसार १०० मोबदल्याचे वाटप केल्याशिवाय भाडेपट्टा कपात करता येत नाही. त्यामुळे आता डीपीडीसीकडून मिळालेले २ कोटी ३१ लाख रूपये वाटप करताना त्यातून भाडेपट्टा कपात करण्यात येऊ नये, अशी मागणी शेतकºयांनी केली होती. मात्र तरीही लघुपाटबंधारे विभागाने भाडे पट्टा कपात करून मोबदल्याची ५० टक्के रक्कम प्रांत कार्यालयाकडे वर्ग केली. त्यामुळे काही शेतकºयांना तर या कपातीमुळे ५० टक्क्यांचा एक रूपयाही मिळू शकणार नाही,अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अजबराव भिमराव पाटील, बळीराम राजाराम पवार, सखाराम नामदेव पाटील, मुरलीधर पांडू पाटील सर्व रा.भोंडण या शेतकºयांनी मंगळवारी लघुपाटबंधारे विभाग कार्यालयात येऊन ठिय्या मारला.आत्महत्येचा इशाराअजबराव पाटील या शेतकºयाची ५४ आर बागायती जमीन यात गेली आहे. मात्र त्यांना जिरायतीच्या दराने तेही मनमानी २.५ लाख रूपये हेक्टरी या दराने या जमिनीचा केवळ ५ लाख ५७ हजार रूपये मोबदला देण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यातही ५० टक्के रक्कमेतून भाडेपट्टा कपात केल्याने त्यांना एक रूपयाही या ५० टक्क्यांपोटी मिळणार नाही, अशी स्थिती आहे. वास्तविक या ठिकाणी बाजारभाव १८ ते २० लाख रूपये हेक्टर असे असताना मनमानीपणे दर लावल्याने शेतकºयांचे नुकसान होत असल्याची तक्रार आहे. तसेच ही रक्कमही १०० टक्के देण्यास टाळाटाळ होत असल्याने या शेतकºयांनी रॉकेलचा डबा, दोर घेऊन येत लघुपाटबंधारे कार्यालयात ठिय्या दिला. तसेच आत्महत्येचा इशारा दिला. मात्र कार्यकारी अभियंता गावित यांनी त्यांची समजूत घालून परत पाठविले.-----डीपीडीसीने अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे महिनाभरात पैसे मिळतील. त्यानुसार त्यांचे वाटप शेतकºयांना करण्यात येईल.-एस.एम. गावीत, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग.
रॉकेलचा डब्बा व आत्महत्येसाठी दोर सोबत घेवून भोंडणचे शेतकरी लघुपाटबंधारे कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:26 PM
भूसंपादन मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक
ठळक मुद्दे २० लाख रूपये हेक्टर प्रमाणे मोबदला मिळावा महिनाभरात पैसे देण्याचे आश्वासन