अमित महाबळ -
जळगाव: एका सायंकाळी चाइल्ड लाइनच्या कार्यालयातील फोन खणखणतो, पलीकडून एक मुलगी मदतीची याचना करत असते. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच मुलीचा फोन येतो. यावेळी मात्र ती प्रचंड घाबरलेल्या स्वरात आपबिती सांगते, ‘काका, वाचवा. मला फाशी देण्याचा प्रयत्न झालाय.’ अख्खी यंत्रणा मिशन मोडवर येते. पटापट सूत्रे हालतात. मुलीला जळगावला आणले जाते. तिचे पालकच तिच्या जिवावर उठलेले असतात. कारण, ती लग्नाला तयार होत नसते. पालक व नातेवाइकांच्या तावडीतून सोडवलेली ही मुलगी आज मुंबईत शिक्षण घेत आहे. तिला लष्करात जायचेय किंवा सीए व्हायचे आहे.
सांभाळ आणि सुरक्षिततेची गरज असलेल्या शून्य ते १८ वयोगटांसाठी चाइल्ड लाइन काम करते. त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी जळगाव लगतच्या एका मोठ्या शहरातून फोन आला होता. सायंकाळची वेळ होती. आई, बाबा, नातेवाईक माझे बळजबरीने लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा विरोध आहे, म्हणून मला मारहाण होत असल्याची व्यथा पलीकडील मुलगी सांगत होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच मुलीचा फोन आला पण यावेळी ती प्रचंड घाबरलेली होती. ‘मला फाशी देण्याचा प्रयत्न झाला आहे. मी कशीबशी घरातून सुटका करून घेतली असून, आता मैत्रिणीकडे आहे’, अशी आपबिती ती सांगते.
गुप्तांगावर मारहाण -यानंतर, चाइल्ड लाइनकडून या मुलीला तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात पोहोचण्यास सांगण्यात आले. अर्ध्या तासात त्यांचे एक पथक मुलीपर्यंत पोहोचले. या मुलीच्या गळ्यावर कशाने तरी आवळल्याचे व्रण आणि अंगावर मारल्याच्या खुणा होत्या. तिच्या गुप्तांगावरही मारलेले होते. त्यामुळे ती चालूही शकत नव्हती. तिला जळगावच्या बालगृहात आणण्यात आले. या मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तिच्यावर उपचार सुरू केले गेले. बालकल्याण समितीने मुलीच्या पालकांना बोलावून समज देत कारवाई केली.
मुलगी आहे राज्यस्तरीय खेळाडू -पुढच्या आठ दिवसांत योग्य उपचाराने मुलीची प्रकृती सुधारली. तिला बारावीची परीक्षा द्यायची होती. तिचा अर्ज भरण्यात आला. वह्या, पुस्तके आणून देण्यात आली. परीक्षेसाठी संरक्षणही देण्यात आले. ही मुलगी ६७ टक्के गुण मिळवत परीक्षा उत्तीर्ण झाली. तिला लष्करात जायचे आहे किंवा सीए करायचे आहे. त्यासाठी तिला बालकल्याण समितीच्या मदतीने मुंबई येथील नामांकित महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत प्रवेश मिळवून देण्यात आला आहे. आज ही मुलगी मुंबईत आहे. गगनभरारी घेण्याच्या तयारीला लागली आहे. विशेष म्हणजे ती राज्यस्तरीय खेळाडू आहे.
चाइल्ड लाइनमुळे या मुलीला वेळेत मदत मिळाली. सांभाळ आणि सुरक्षिततेची गरज असलेल्या शून्य ते १८ वर्षे वयोगटांतील मुलामुलींसाठी चाइल्ड लाइन २४ तास मोफत काम करते, आपातकालीन सहायता पुरवते. १०९८ हा संपर्क क्रमांक आहे, असे जिल्हा समन्वयक, चाइल्ड लाइन भानुदास येवलेकर यांनी सांगितले.
चाईल्ड लाईनला काय कळवाल -- अल्पवयीन मुलामुलींचे विवाह- मुलामुलींचे लैंगिक, शारीरिक, मानसिक शोषण- आजारी व एकटे मूल- निवाऱ्याच्या शोधात असलेले मूल- बेवारस किंवा हरवलेले मुल- एखाद्या मुलाला मारहाण होत असेल- मजुरी करणारे मूल- मजुरी करणाऱ्या मुलामुलींचे वेतन नाकारले.- रस्त्यावरच्या एखाद्या मुलाचा छळ होत असेल.- स्वयंसेवक म्हणून काम करायचे असल्यास.