जळगाव : प्लॅस्टिक कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट होत नसल्याने व ते जागोजागी पडून प्रदूषण वाढत असल्याने त्यावर मात करण्यासाठी आता शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने कचरा गोळा करीत शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याची मोहीम आकाराला येत आहे. यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेतला असून महानगरपालिकेशी चर्चा करून ही मोहीम राबविली जाणार आहे.राज्यात विविध प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली असली तरी शहरासह अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांसह वेगवेगळ््या प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर झाला तरी त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे शहरात जागोजागी प्लॅस्टिकचा कचरा पडलेला दिसतो व पर्यावरणास बाधा पोहचत आहे.केवळ चांगल्या प्लॅस्टिकची विल्हेवाटप्लॅस्टिकच्या बºयाच वस्तूंपैकी केवळ प्लॅस्टिक बाटल्या व चांगल्या प्रकारच्या प्लॅस्टिकची भंगारात खरेदी केली जाते. मात्र बारीक प्लॅस्टिक पिशव्या, बिस्कीट, खाद्य पदार्थांचे आवरण अशा बहुतांश प्रकारच्या प्लॅस्टिकला मागणी नसते. परिणामी ते रस्त्यावर कोठेही पडलेले असते. सोबतच कचराकुंड्यांमधून कचरा वेचणारे हे प्लॅस्टिक उचलत नाही. त्यामुळे ते अस्ताव्यस्त झालेले दिसते. त्यातून गटारी, नाले यामध्ये पाणी साचणे असे प्रकार घडत असतात. हे टाळल्यास प्लॅस्टिकचा त्रास होऊ शकत नाही. त्यासाठी जळगावातील उद्योजक सरसावले आहेत.शालेय विद्यार्थ्यांमार्फत लावणार शिस्तशालेय विद्यार्थ्यांना कोणतेही काम सांगितल्यास त्याची योग्य अंमलबजावणी होऊन ते प्रभावीपणे राबविलेदेखील जाते. यासाठी आता प्लॅस्टिक कचरा मुक्तीसाठीही विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आपापल्या घरून कचरा संकलन करून तो शाळेत आणण्यास सांगितला जाणार असून तेथून तो एकत्रितरित्या संकलित केला जाईल व त्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल, अशी ही योजना राहणार आहे.महापालिकेशी चर्चाप्लॅस्टिक रिप्रोसेसिंग इंडस्ट्रीज असोसिएशनने यासाठी पुढाकार घेतला असून महापालिकेसोबत ही मोहीम राबविली जाणार आहे. यात मनपा आयुक्तांशी प्राथमिकस्तरावर चर्चादेखील करण्यात आली असून लवकरच ती प्रत्यक्ष आकाराला येईल, असे सांगितले जात आहे.बाटल्यांना आला भाव२००१पर्यंत प्लॅस्टिक बाटल्यांना मागणी नव्हती. मात्र या बाटल्यांवर प्रक्रिया होऊ लागली व त्यांना मागणी वाढून ३० ते ५० रुपये प्रती किलोने भाव मिळू लागला. त्यामुळे या बाटल्यांना मागणी वाढल्याने त्या शक्यतो कचरा म्हणून कोठे फेकल्या जात नाही. अशाच प्रकारे इतरही प्लॅस्टिकला मागणी वाढल्यास हा कचरा आपसूकच कमी होईल, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.प्लॅस्टिक कचºयाची व्यवस्थित विल्हेवाट लावली जात नसल्याने तो कोठेही पडलेला असतो. हे टाळण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना आपापल्या घरून प्लॅस्टिक कचरा एकत्रित करून तो शाळेत आणण्यास सांगण्यात येऊन तेथून तो संकलित केला जाईल. त्यामुळे शहरातील प्लॅस्टिक कचरा नष्ट होण्यास मदत होईल. मनपाच्या सहकार्याने ही मोहीम राबविली जाईल.- विनोद बियाणी, अध्यक्ष, प्लॅस्टीक रिप्रोसेसिंग इंडस्ट्रीज असोसिएशन, जळगाव.
शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने शहर होणार प्लॅस्टिकमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:06 PM