जळगाव,दि.11- आजकाल नातवांचे वाढदिवस आजोबा मोठय़ा धुमधडाक्यात साजरे करीत असतात. कारण त्यांच्यासाठी तो मोठाच आनंदाचा क्षण. नातीच्या वाढदिवशी एका गरजू मुलीला मदतीचा हात देऊन भुसावळ पंचायत समितीमधील शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांनी बेटी बचाओ- बेटी पढाओ चा संदेश दिला आहे.
पिंप्राळा परिसरातील आनंद मंगल नगरातील रहिवासी सुमित्र अहिरे यांची नात आणि जळगावच्या बेंडाळे कनिष्ठ महाविद्यालातील शिक्षिका ईरावती रवींद्र सोनवणे यांची कन्या ध्रुविका हिचा पहिला वाढदिवस नुकताच झाला. आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झालेल्या कार्यक्रमात पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या वाढदिवसाचे निमित्त साधून अहिरे व सोनवणे परिवाराने पिंप्राळा येथील दांडेकर नगरात राहणा:या आरती अशोक सपकाळे या विद्यार्थिनीला मदतीचा हात दिला. आरती ही शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे. घरची स्थिती अतिशय नाजूक. आई पिंप्राळा परिसरातील अनेक घरी धुणी भांडी करते तर वडील सेंट्रीग कामगार. आरतीला दहावीला 93 टक्के गुण होते. तंत्रनिकेतनच्या शेवटच्या वर्षात तिने दोन ठिकाणी शिकवणी लावली होती. शिकण्याची जिद्द पण त्यासाठी पैसे नसल्याने शिकवणी सोडण्याचा विचार आई-वडिलांनी बोलून दाखविला. कारण शिकवणीचे दहा हजार रुपये बाकी होते.
आरतीची शिकवणी सुटल्यास कदाचित शिक्षण अपूर्ण राहू शकते, अहिरे यांना ही बाब कळल्यावर त्यांनी आरती व तिच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले. आरतीच्या घरची स्थिती कळल्यावर अहिरे व सोनवणे या परिवाराने तिला तत्काळ दहा हजार रुपयांची मदत केली. एवढेच नाही तर तिच्या पुढील शिक्षणासाठी हवी ती मदत देण्याचे आश्वासन दिले. या मदतीमुळे आरती आणि तिच्या परिवारातील सदस्यांनी कृतज्ञता व्यक्त करीत अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. यावेळी ध्रुविकाचे वडिल रवींद्र शंकरराव सोनवणे, राजश्री अहिरराव, विशाखा अहिरे, विशाल व शुभम अहिरराव उपस्थित होते. आम्ही शिकलो नाही पण आरतीला कुठल्याही स्थितीत आपण जिल्हाधिकारी बनवू, असा निश्चय तिच्या आईने बोलून दाखविला.
प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मलाही अनेक लोकांनी मदत केली होती. नातीच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने मी यातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रय} केला आहे.
- सुमित्र अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी