विलास बारी / आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१०- वाढत्या शहरीकरणामुळे मानव आणि साप यांच्यातील संघर्ष वाढत आहे. साप हा मानवासाठी धोकेदायक असल्याच्या भावनेतून सापाला मारण्याचे प्रमाण वाढत आहे. पावसाळ्यात नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने साप मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याने सर्पदंश टाळण्यासाठी सावध राहण्याची आवश्यकता आहे.
सर्वसाधारणपणे खान्देशात विषारी, निम विषारी सर्प आणि बिन विषारी सर्प या तीन प्रजातींचे साप आढळून येतात. तीन प्रजातीत सुमारे ३० जातींचे साप आढळून येतात.
साप व मानवातील संघर्ष
उन्हापासून संरक्षणासाठी उंदीर, घुस, मुंगूस व इतर जीव जमिनीत खोल बिळ करून स्वत:चे संरक्षण करून घेतात. मात्र बिळ करू न शकणारे सापासारखे प्राणी या जिवांनी केलेल्या बिळामध्ये ताबा मिळवितात व स्वत:चे रक्षण करतात. पावसाळा सुरु होताच भक्ष्यासाठी बिळातून बाहेर आलेले साप मुख्यत: मानवी वस्तीकडे आकर्षित होतात, आणि तेथून साप आणि मानव यांच्यातील संषर्घ निर्माण होतो.
खान्देशातील सापाच्या या आहेत जाती
विषारी सापाच्या सहा जाती आहेत. त्यात नाग, घोणस, फुरसे, मण्यार, पोवळा, चापडा यांचा समावेश आहे. निमविषारी सर्पांमध्ये मांजºया, जाड रेती सर्प, भारतीय अंडीखाऊ सर्प, उडता सोनसर्प, हरणटोळ यांचा समावेश आहे. या सापांच्या दंशाने मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे. बिनविषारी सर्पांमध्ये अजगर, धामण, तस्कर, पहाडी तस्कर, दिवड, मांडूळ, गवत्या, रुळा, नानेटी, धुळ, नागीण, वाळा, चुंचवाळा, डुरक्या, घोणस, कवड्या, पट्टेरी कवड्या, कुकरी, व्हेरीगेटेंड कुकरी, काळतोंड्या असे प्रकार आढळून येतात.
सापाचे दैनंदिन कार्य कसे?
साप जमिनीतून पसरणाºया कंपनांचा अंदाज घेऊन त्याच्या केंद्रबिंदूपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. साप जिभेवर वासाचे कण गोळा करून भक्ष्याचा पाठलाग करतो. त्यासाठी टाळूमध्ये असलेल्या जेकबसन या इंद्रियाचा वापर तो करतो. सापाचे दोन्ही डोळे दोन वेगवेगळ्या दिशांना पाहत असल्याने त्याला धूसर दिसते. साप शीत रक्ताचा प्राणी असल्याने वातावरणातील बदलाचा त्याच्या शरीरावर मोठा परिणाम होत असतो.
साप दिसल्याबरोबरोबर सर्पमित्राला बोलवा
साप दिसल्यानंतर त्याला न मारता जाणकार, अनुभवी सर्पमित्राशी संपर्क साधावा. सापाला अडगळीत जाण्यापासून रोखावे. कुटुंबातील लोकांना, पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढावे. स्वत: साप पकडण्याचा प्रयत्न करू नये. सापाला हुसकावून लावतांना लांब काठी, तारेचा आकडा अशा गोष्टींचा वापर करून घरापासून लांब सोडावा.
सापाच्या भीतीनेच होतो मृत्यू
बिनविषारी साप चावल्याने कधीही मृत्यू येत नाही. केवळ सापाने आपल्याला चावा घेतला आणि आपला मृत्यू होणार या कल्पनेने मानसिक धक्का बसून बाधित व्यक्ती बेशुद्ध होते. किंवा सर्पदंशानंतर त्याची हृदयक्रिया बंद पडून अशा व्यक्ती मृत्यू पावतात.
खान्देशात २० टक्के विषारी व ८० टक्के बिनविषारी साप आढळतात. पावसाळ्यात सापांचे बिळ नष्ट झाल्याने ते जमिनीवर किंवा मानवी वस्तीकडे आकर्षित होतात. अडचणीच्या ठिकाणी काम करतांना पायात बुट असावे तसेच रात्रीच्या वेळी बॅटरी व काठी सोबत असावी. जेणेकरून साप असल्यास तो दूर निघून जाईल. साप आढळून आल्यानंतर त्याला स्वत: पकडण्याचे धाडस न करता सर्पमित्राला बोलवा.
वासुदेव वाढे, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव.