कोरोना थांबेना : खासगी डॉक्टर लिहून देतात, रुग्णांच्या नातेवाइकांची होते फिरफिर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनची परिस्थिती बिकट असताना आता टॉसिलिझ्युमॅब हे इंजेक्शन जळगावात कुठेच मिळत नसून खासगी डॉक्टर लिहून देतात व इंजेक्शनसाठी नातेवाइकांना वणवण फिरावे लागत आहे. गेल्या दीड महिन्यात ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. दरम्यान, रेमडेसिविरची मागणी अधिक आणि पुरवठा कमी हे चित्र कायम आहे.
पुरवठा कमी
टॉझिलिझ्युमॅब हे इंजेक्शन महाराष्ट्रातच उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. जळगावातील हा साठा संपला आहे. दुसरीकडे रेमडेसिविरची नियमित दोन ते अडीच हजारांची मागणी असताना ५०० ते १००० पर्यंत हे इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. कधी कधी रेमडेसिविर येत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनची शासकीय यंत्रणेतही आणीबाणी निर्माण झाली आहे. मात्र, आतापर्यंत ते उपलब्ध होऊन गेले आहे. टॉसिलिझ्युमॅब हे इंजेक्शन तर खासगी यंत्रणेत देणेच ऑक्टोबरपासून बंद करण्यात आले आहे.
रेमडेसिविर : मागणी २५०० पुरवठा ५०० ते १०००
टॉझिलिझ्युमॅब : जळगावात संपल्याची माहिती
फॅविपिरॅविर : पुरेशा प्रमाणात उपलब्ध
झिंक टॅबलेट : काहीसा तुटवडा
सी व्हिटॅमिन : पुरेशा प्रमाणात उपलब्ध
एकूण रुग्ण १,१३,७०४
उपचार सुरू असलेले रुग्ण
औषधींसाठी वणवण
आमच्या नातेवाइकांना सुरुवातीला रेमडेसिविर द्यायला सांगितले होते. हे चार इंजेक्शन उपलब्ध झाले ते दिले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी टॉझिलिझ्युमॅब हे इंजेक्शन लिहून दिले होते. मात्र, हे इंजेक्शन सर्व जळगाव फिरून कुठेच उपलब्ध झाले नाही. अखेर जे उपचार सुरू आहेत तेच सुरू ठेवा असे आम्ही डॉक्टरांना सांगितले.
- रुग्णाचे नातेवाईक
आमच्या नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्शनही उपलब्ध होत नव्हते, आता टॉझिलिझ्युमॅब हे इंजेक्शन सांगितले आहे. ते कुठेच मिळत नाहीय. शिवाय हॉस्पिटलमध्येच दहा दिवसांपेक्षा अधिक वेळ झाला आहे. इंजेक्शनचा सर्वदूर तुटवडा असल्याचे सर्व सांगतात- रुग्णाचे नातेवाईक
अन्य औषधी शासकीय यंत्रणेत पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. टॉसिलिझ्युमॅब हे इंजेक्शन शासकीय यंत्रणेत रुग्णांना दिले जात नाही. रेमडेसिविरचा थोडा साठा कमीच आहे. अन्य औषधी मात्र पुरेशा आहेत. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक.