लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रभारी कुलगुरूंच्या अनुपस्थितीत बैठक सुरू करणे... सुधारित इतिवृत्त न देणे... सोबतच कुलपतींची परवानगी न घेता परस्पर बैठकीच्या तारखा जाहीर करण... या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी कुलपती अर्थात राज्यपालांकडे केली आहे.
लेखापरीक्षण व अर्थसंकल्पाची महत्त्वपूर्ण बैठक ही २५ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. बैठकीला अर्धा तास उलटल्यानंतर प्रभारी कुलगुरू बैठकीतच नसल्याची बाब अधिसभा सदस्यांच्या लक्षात आली. त्यानंतर प्रभारी कुलगुरू कुठे आहेत व त्यांच्याविना बैठक कशी सुरू करण्यात आली, असा जाब विचारत त्यांनी गोंधळ घातला होता. शेवटी ऑनलाईन बैठकीत कुलगुरूंनी हजेरी लावत क्षमा मागितली व बैठक पुढे ढकलली. सोबतच पुढील काळात ऑफलाईन पद्धतीने बैठक होईल, असे घोषित केले. नंतर ३१ मार्च रोजी अधिसभा असल्याचे कळविण्यात आले. परंतु, या बैठकीसाठी कुलपतींची परवानगी घेण्यात आली होती का? असा सवाल सदस्यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे. सुधारित इतिवृत्तही सदस्यांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे तेसुद्धा तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी केली आहे. त्याचबरोबर बैठकीच्या संपूर्ण गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशीही मागणी अधिसभा सदस्य प्रा. एकनाथ नेहते, प्रा. डॉ. अनिल पाटील, प्रा. डॉ. गौतम कुवर, प्रा. डॉ. प्रकाश अहिराव, प्रा. डॉ. किशोर कोल्हे, प्रा. डॉ. संध्या सोनवणे, प्रा. डॉ. सुनील गोसावी यांनी केली आहे.